लोकसभा निवडणुका बुधवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचे रणशिंग फुंकत इच्छुक उमेदवार गल्लोगल्ली दिसू लागले आहेत. मकर संक्रातीच्या निमित्ताने जागोजागी आयोजित करण्यात येणारा हळदीकुंकू समारंभ हा महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याची उत्तम पर्वणी ठरते. त्यानुसार जानेवारी महिन्याच्या मध्यावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी हळदीकुंकवाचा सर्वत्र धडाकाच लावून दिला. मात्र संक्रांत संपली तरीही ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात अजूनही हळदीकुंकू समारंभाचा धडाका सुरू असून काही उमेदवारांनी तर या निमित्ताने स्पर्धा भरवून महिला मतदारांना टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारखी महागडी उपकरणे बक्षीसरूपाने वाटण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकांचा हंगाम जवळ येताच वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केले आहेत. मकर संक्रातीच्या काळात जागोजागी साजरे होणारे हळदीकुंकवाचे समारंभ हे राजकीय पक्षांसाठी पर्वणीच ठरले होते. नवी मुंबईत एका बडय़ा राजकीय नेत्याने आपल्या पक्षातील नगरसेवकांसाठी हळदी कुंकवाचा समारंभ घडवून आणण्यासाठी खास निधी सूपुर्द केल्याची चर्चा रंगली होती. संक्रांतीच्या काळात हळदीकुंकवाचे सोहळे आयोजित करण्यात येतात. मात्र या वेळी उमेदवारी निश्चिती नसल्याने हे सोहळे रथसप्तमीनंतरच सुरू झाले. उमेदवारी निश्चित होते आहे, हे लक्षात येताच उमेदवारांनी आपल्या बगलबच्च्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमांची आखणी सुरू केली. महिला मेळावे, स्पर्धा आणि हळदीकुंकू सोहळा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे स्वरूप सुरू झाले. हळदीकुंकवाच्या कार्यक्रमातून केवळ छोटय़ा वस्तू न देता महिलांसाठी साडय़ांचे वाण अनेक ठिकाणी देण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक महिलेला साडय़ांचे वाटप होत असल्याने महिलांची मोठी झुंबड अशा कार्यक्रमांना उसळली असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवली परिसरात काही दिवसांपासून दिसून आले.
या भागातील एका उमेदवाराने महिलांना वाण देण्यासाठी साडय़ांनी भरलेले ट्रक या भागात रिते केल्याने महिलांमधील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. महिलांमध्ये लोकप्रिय झालेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा आधार घेत या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी विशेष स्पर्धादेखील या इच्छुक उमेदवारांनी आयोजित केल्या होत्या. डोंबिवलीतल्या भागशाळा मैदान, कल्याण पूर्वेतील गायत्री मैदान, अंबरनाथमधील नगरपालिकेच्या आंबेडकर मैदानांमध्ये झालेल्या कार्यक्रमांना महिलांची मोठय़ा गर्दी झाली होती. दुपार ते रात्री ११ वाजेपर्यंत मोठय़ा आवाजाच्या डीजेच्या तालावर महिलांचे हे खेळ घेतले जात होते आणि विजेत्यांना टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा गृहोपयोगी वस्तूंचे वाटप बक्षिसांच्या माध्यमातून केले जात आहे. याव्यतिरिक्त महिला विशेष सहली, मेळावे अशा कार्यक्रमांचेदेखील आयोजन केले जात असून महिला वर्गाला आपल्या बाजूने वळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न उमेदवार करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा