उत्सवाआडून कुरघोडय़ांना ऊत
दहीहंडी उत्सव जल्लोषातच साजरा करणार अशी भूमिका घेत ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी एकीकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री जीतेंद्र आव्हाड यांच्या ‘सुरात सूर’ मिसळण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकल्याने दहीहंडीच्या निमित्ताने ठाण्यातील अजब राजकारणाच्या गजब तऱ्हा पाहायला मिळत आहेत. दहीहंडी उत्सवाविषयी ठाण्यातील शिवसेनेची भूमिका स्पष्ट होण्यापूर्वीच आमदार सरनाईक यांनी सोमवारी या उत्सवातील झगमगाटाला आवर घालण्याचे जाहीर केल्याने आपसूकच प्रसिद्धीचा झोत त्यांच्याकडे वळला आणि शिवसेनेत मतभेदांची हंडी उभी राहिली. निर्णयाची हंडी आधीच फुटल्याने मंगळवारी यासंबंधी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याच्या तयारीत असणारे शिवसेनेचे ठाण्यातील सर्वेसर्वा एकनाथ िशदे यांची मोठी कोंडी झाली. त्यामुळे काहीसे खट्टू झालेल्या एकनाथरावांनी मंगळवारी ‘जल्लोषा’चा नारा देत सरनाईकांना एकाकी पाडल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करत या सगळ्या वादात आतापर्यंत एकाकी पडलेल्या आव्हाडांना मात्र शिवसेनेच्या भूमिकेमुळे मोठा आधार मिळाला असताना तेथे शिवसेनेत आडोशाला सारले गेलेल्या सरनाईकांच्या पाठीवर डावखरेंनी कौतुकाची थाप देत ‘मैं हूना’चा राग आवळल्याने दहीहंडी उत्सवाच्या आडून ठाण्यात सहमतीच्या राजकारणाचे अनोखे प्रदर्शन घडू लागले आहे.
ठाण्यातील दहीहंडी उत्सवाआडून होणाऱ्या राजकारणाचे ओंगळवाणे प्रदर्शन कधीच लपून राहिलेले नाही. संस्कृती आणि संघर्षांच्या बाता मारत एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी या उत्सवांचा येथील राजकीय नेते कसा वापर करतात हेदेखील ठाणेकरांनी अनुभवले आहे. दहीहंडी उत्सवात आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या मंडळांच्या मुसक्या बांधण्यासाठी ठाणे पोलिसांनी मोर्चेबांधणी करताच येथील राजकीय वर्तुळात गहजब उडाला. तेव्हापासून आतापर्यंत सुरू झालेल्या वादात सरस ठरण्याची नवी स्पर्धा येथील राजकीय नेत्यांमध्ये सुरू झाली असून उत्सवाच्या आडून समन्वयाच्या नव्या राजकारणाचे वारे पुन्हा एकदा शहरात वाहू लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा