भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांचे वय वाढल्याने बेताल बोलत आहेत. या अमरसिंह पंडित यांच्या टिप्पणीने भाजपचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले. शनिवारी रात्री पंडित यांच्या घरासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला. आमदार पंडित यांचा मुंडे यांच्या विरोधातील संघर्ष थेट रस्त्यावर आला आहे.
खा. गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत ८ कोटी रुपये खर्च झाला, असे जाहीर वक्तव्य केल्याने सर्वत्र गदारोळ उडाला आहे. शनिवारी मात्र विषयावर राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी एका वृत्तवाहिनीवर खा. मुंडे ‘वय वाढल्याने बेताल वक्तव्य’ करीत असल्याची टिपण्णी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रात्री नऊच्या सुमारास थेट पंडित यांच्या घरासमोर निषेधाच्या घोषणा देत आंदोलन कले.
पंडित यांच्याकडून तक्रार न आल्याने कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून दिले. आ.पंडित यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊन खा. मुंडे यांचा अवमान करू नये, असे सांगत भाजपचे प्रदेश सचिव आर. टी. देशमुख यांनी ‘टवाळाला आवरा’ असा सल्ला दिला. तर मुंडेच्या जीवावर आमदार होऊन स्वार्थासाठी राष्ट्रवादीत जाणाऱ्या पंडित यांनी तोंड सांभाळावे, अन्यथा परिणाम भोगावे, असा इशाराही जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, अॅड. सर्जेराव तांदळे यांनी दिला. रविवारी (दि. ३०) गेवराई, वडवणी, माजलगाव, केज, परळी, अंबाजोगाई, पाटोदा, या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पंडित यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. पंडित यांच्या निवासस्थानाला पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शांत राहावे, आपली भाजपला धास्ती वाटत आहे, त्यामुळे सहानुभूती मिळविण्यासाठी खा. मुंडे आंदोलन करवून घेत आहेत. आपण आपल्या प्रतिक्रियेवर ठाम असून त्यामुळे भाजपची गुंडगिरी जनतेसमोर येत आहे. पण भाजपमध्ये आंदोलन करणारे कार्यकर्ते आपले जुनेच सहकारी आहेत. खा. मुंडे यांच्या सूचनेवरून त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस तक्रार दिली नाही. खा. मुंडे यांना आपली इतकी धास्ती वाटत आहे, पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शांत राहावे, असे आवाहन पंडित यांनी केले. राष्ट्रवादीचे रमेश आडसकर, माजी आ. उषा दराडे, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलन व गुंडगिरीचा निषेध केला आहे. जिल्ह्य़ात पंडित-मुंडे संघर्ष थेट रस्त्यावर आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा