राज्यातील काँग्रेसप्रणित आघाडी सरकार सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. राज्यातील पृथ्वीराज चव्हाण सरकार कोमात गेल्याची प्रखर टीका भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, प्रदेश चिटणीस संजय धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात ओला व कोरडा दुष्काळ आहे. राज्यातील दुष्काळाचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकार राज्याच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत नाही. सामान्य जनता राज्य सरकारने वाऱ्यावर सोडली आहे. इतर राज्यांना केंद्र सरकार मदत करते, पण राज्यातील काँग्रेसच्या आघाडी सरकारला मदत करत नसल्याचे उघड झाले आहे. राज्यातील पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार कोमात गेल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पश्चिम विदर्भातील भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते.
वीज दरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मुळा प्रवरा सोसायटीचे २३०० कोटी, उद्योग क्षेत्राचे ११०० कोटी व सरकारची महावितरणला देणी असलेली १८०० कोटी रुपये याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. हे दुर्लक्ष करताना राज्याने ६,९१२ कोटी रुपयांची अन्यायकारक दरवाढ जनतेवर लादल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला. २०१२ पर्यंत वीज भारनियमन रद्द करण्याचा ऊर्जामंत्री अजित पवार यांचे स्वप्न मुंगेरी लाल के हसीन सपने असल्याची टीका त्यांनी केली.
राज्यातील मंत्रिमंडळात अनेक नेत्यांवर आरोप झाले आहेत. त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची गरज आहे. गुलाबराव देवकर, छगन भुजबळ, सुनील तटकरे व नव्याने कोळसा घोटाळ्यात नाव आलेले राजेंद्र दर्डा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या सर्वानी तात्काळ राजीनामा दिला नाही तर संबंधित प्रकरणांच्या चौकशीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. अजब सरकारची ही गजब कहाणी असल्याचे ते पुढे म्हणाले. या विरोधात आता भाजप रस्त्यावर आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.
विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप व शिवसेना काही जागांवर अदलाबदल करण्याची शक्यता असून ही अदलाबदल निवडणुकीच्या तोंडावर न करता ती २०१२ मध्ये निश्चित केली जाईल, असे सुतोवाच त्यांनी केले. २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या संभाव्य निवडणुका या पुढील वर्षी अर्थात २०१३ मध्ये मध्यावधीच्या माध्यमातून होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. भाजप पंतप्रधानपदाचा उमेदवार योग्य वेळी निश्चित करेल, असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. आमच्या मित्रपक्षाला भाजपचा उमेदवार पंतप्रधान व्हावा, असे वाटत असल्याच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. भाजप नेत्या सुषमा स्वराज्य या पंतप्रधान व्हाव्यात, अशी मागणी शिवसेना प्रमुखांनी केली होती, याविषयी प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
येथील शासकीय विश्रामगृहात भाजपची अमरावती विभागीय पक्षांतर्गत बैठक होती. अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाच जिल्ह्य़ातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीला प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, संघटन सरचिटणीस रघुनाथ कुळकर्णी, पश्चिम विदर्भ संघटनमंत्री रामदास आंबटकर, तेजराव थोरात व नोंदणी प्रमुख आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. यवतमाळ येथून विजय कोटेचा, राजेंद्र डांगे, अमरावती येथून डॉ.प्रदीप शिंगोरे, निवेदिता चौधरी, बुलढाणा संजय कुटे, मोहन शर्मा, वाशिम येथून सुरेश लुंगे, प्रशांत रत्नपारखी, अकोला येथील मनोहर राहणे व अशोक ओळंबे यांची उपस्थित होती.
मामांच्या मदतीला भाऊ
पत्रकार परिषदेत सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात भाजपने अपेक्षेपेक्षा दुप्पट म्हणजेच ४५ लाख भाजप सदस्यांची नोंदणी केल्याचे सांगितले. अकोल्यात भाजप खासदार संजय धोत्रे यांचा भाचा ऋषीकेश पोहरे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश खासदारांचे व सदस्य नोंदणीचे अपयश दाखवित नाही का, असा प्रश्न पत्रकाराने केला. सुधीर भाऊंनी खासदार धोत्रे यांची बाजू घेत मला कुणाचे नाते काय आहे, याची माहिती नाही. भाचा, काका, मामा या नात्याने पक्ष चालत नाही, असे त्यांनी सांगितले. विजयाराजे शिंदे यांचा दाखला त्यांनी दिला. तसेच सोनिया गांधी यांची सख्खी जाऊ भाजपत आहे, असे म्हणत मुनगंटीवार यांनी खासदार संजय धोत्रे यांना एकप्रकारे पाठबळ दिले. या संवादात मध्यस्थी करत पक्षात घराणेशाही नसल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी स्पष्ट केले.