मुंडे कुटुंबातील फाटाफुटीनंतर प्रतिष्ठेच्या झालेल्या नाथ्रा ग्रामपंचायतीसह तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजय मिळवून भाजप बंडखोर व राष्ट्रवादी समर्थक आमदार धनंजय मुंडे यांनी आपले स्वतंत्र नेतृत्व सिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील प्रमुख ग्रामपंचायतीत प्रथमच भाजपला पराभवाचा धक्का बसला. भाजपने जवळपास ३५ ग्रामपंचायतींवर विजय मिळवत आपली आघाडी कायम ठेवली.
गृहकलहानंतर झालेल्या दुसऱ्या निवडणुकीत पुतण्याने काकाला राजकीय धक्का देत जिल्हा परिषद निवडणुकीतील दारुण पराभवाचे उट्टे काढल्याचे मानले जात आहे. गेवराईत नव्याने राष्ट्रवादीत आलेल्या आमदार अमरसिंह पंडित यांच्या ताब्यातून दैठण ग्रामपंचायत राष्ट्रवादीचेच आमदार बदामराव पंडित यांनी हिसकावून घेतली. जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत निवडणुकीत या वेळी सर्वाधिक लक्ष परळी तालुक्यातील नाथ्रा ग्रामपंचायत निवडणुकीकडे लागले होते. भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार मुंडे यांचे पुतणे आमदार धनंजय मुंडे यांनी बंड केल्यानंतर ज्येष्ठ बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंडे कुटुंबातील फाटाफुटीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मुंडे पिता-पुत्रांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वानीच प्रतिष्ठा पणाला लावली. मुंडे कुटुंबीयांचे जन्मगाव असलेल्या नाथ्रा येथील ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी भाजपच्या आमदार पंकजा पालवे व आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, या वेळी आमदार धनंजय मुंडे यांनी सर्व सातही जागा जिंकून काका खासदार मुंडे यांच्या पॅनेलचा पराभव केला.
स्थापनेपासून या ग्रामपंचायतींवर खासदार मुंडेंचे वर्चस्व राहिले आहे. पंडितराव मुंडे हे २५ वर्षे सरपंच होते. पक्षांतराच्या वेळी खासदार मुंडे यांचे दुसरे पुतणे सरपंच अजय मुंडे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पांगरी, इंजेगाव या प्रमुख ग्रामपंचायतींसह तालुक्यातील निवडणूक झालेल्या ६९ पैकी ३१ ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा आमदार धनंजय मुंडे यांनी केला. तर परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या ४० पैकी २९ ग्रामपंचायतीही राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याचा दावा केला.
भाजपच्या स्थानिक नेतृत्वानेही ग्रामपंचायतींवर बहुमताने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. त्यामुळे पक्षांतरानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतील दारुण पराभवाचा बदला ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार धनंजय मुंडे यांनी घेतल्याचे मानले जात आहे. गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित व आमदार अमरसिंह पंडित या काका-पुतण्यांचे जन्मगाव असलेल्या दैठण येथील ग्रामपंचायत या वेळी नव्याने राष्ट्रवादीत दाखल झालेल्या विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांच्या ताब्यातून काढून घेण्यात बदामराव पंडित यांनी यश मिळवले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत परळीत पुतण्याने काकाला तर गेवराईत काकाने पुतण्याला राजकीय झटका दिला.

Story img Loader