खेळामध्ये राजकारण नको असे म्हणत कबड्डी दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व संयोजक, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी राजकीय चढाई केली. हातकणंगले या साखर पट्टय़ातील लोकसभा निवडणुकीचे समीकरण डोळ्यासमोर ठेवून जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. सा. रे. पाटील या काँग्रेसच्या दोघा ज्येष्ठ नेत्यांचे स्तुतिगान करीत साखर पेरणी केली. तर, दोन महिन्यापूर्वी झालेल्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेवेळी जिल्हाध्यक्ष असतांनाही निमंत्रित न केल्याची खदखद व्यक्त करीत धनंजय महाडिक यांनी आपला असंतोष व्यक्त केला. मात्र याचवेळी कबड्डी दिनाच्या कार्यक्रमाला शहरात वास्तव करणाऱ्या मंत्र्यांना निमंत्रित न केल्याचा विसर मात्र त्यांना पडला होता.    
या वर्षांत कोल्हापूर शहरामध्ये कबड्डीचे दोन विशेष कार्यक्रम झाले. राज्य शासनाच्यावतीने आयोजित केली जाणारी छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धा शिवाजी स्टेडियमवर झोकात पार पडली. राज्य शासनाकडून ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला असला तरी त्यामध्ये आणखी तितकाच निधी घालून स्पर्धेचे संयोजक गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्पर्धा थाटात पार पाडली होती. शिवाय विजेत्या संघाला दुबईची सफर घडवून आणण्याची विशेष घोषणा करून त्यांनी कबड्डी विश्वात खळबळ उडवून दिली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना पाचारण करण्यात आले होते. ही स्पर्धा वरवर पाहता सुरळीत पार पाडली तरी त्यामध्ये सतेज पाटील-धनंजय महाडिक यांच्यातील असंतोषाचे बीज रोवले गेले होते. कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे धनंजय महाडिक हे अध्यक्ष असतांनाही त्यांना या शासकीय स्पर्धेसाठी निमंत्रित केले गेले नव्हते.     
छत्रपती शिवाजी चषक कबड्डीवेळी झालेल्या अवमानकारक वागणुकीची खंत धनंजय महाडिक यांनी सोमवारी शाहू स्मारक भवनात झालेल्या कबड्डी दिनावेळी व्यक्त केली. जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. याचे कर्तृत्व महाडिक यांनी नेटकेपणाने पार पाडले.म्हणजे त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा दिल्यावर यशस्वी करण्याचा शब्द तर दिलाच; शिवाय स्थानिक उदयोन्मुख कबड्डीपटूंना मानधन सुरू करण्याचा शब्द देऊन खेळाडूंची कदर केली. खेरीज, राज्य कबड्डी संघटनेला १ लाख रूपयांची भरीव देणगीही जाहीर केली. पण याचवेळी छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजक पद ‘कोणाला तरी’ दिल्याचा उल्लेख करून सतेज पाटील यांची संभावना केली.    
जिल्हाध्यक्षाला स्पर्धेसाठी निमंत्रित न केल्याची खदखद व्यक्त करून महाडिक यांनी खेळात राजकारण आणल्याचा अप्रत्यक्ष आरोपही मंत्री पाटील यांच्यावर केला. मात्र ही टीका करीत असतांना महाडिक यांना कबड्डी दिनाच्या कार्यक्रमाला कोल्हापुरातच राहणारे मंत्री पाटील यांना आपण निमंत्रित केले नसल्याचा सोयीस्कर विसर मात्र पडला. खेळात राजकारण आणू नये, असा दोंन्ही कार्यक्रमांच्यावेळी दोघा आयोजकांनी आवर्जून उल्लेख केला असला तरी प्रत्यक्षात ही कृती मात्र राजकीय असल्याचे आता स्पष्ट होत आहे.    
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कबड्डी दिन या खेळाच्या व्यासपीठाचा वापर अप्रत्यक्षरीत्या राजकारणासाठीच करून घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीचे हातकणंगले तालुक्यातील समीकरण लक्षात घेऊन त्यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार डॉ.सा.रे.पाटील या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा मुक्तकंठाने गौरव केला. क्रीडा क्षेत्राचा कार्यक्रम असल्याने आवाडे व डॉ. पाटील यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले असते तर ते समजण्यासारखे असते. पण त्याही पलीकडे जाऊन पवार यांनी या दोघा ज्येष्ठ नेत्यांचे स्तुतिगान अंमळ अधिकच केले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघात रोखण्याचे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस वाटचाल करीत आहे. मात्र हा मार्ग अडचणीचा असल्याचे लक्षात घेऊन अजित पवार यांनी साखर पट्टय़ातील आवाडे व डॉ.पाटील यांच्याकडे अधिकच लक्ष देण्याचा हेतू राजकीय स्वरूपाचा होता, असे म्हणण्यास पुरेशी जागा होती. या दोघा मोठय़ा साखर कारखान्यांच्या अध्यक्षांच्या पाठबळामुळे राष्ट्रवादीचा यशाचा गाडा पुढे सरकणे तसे कठीणच आहे,हे जाणूनच उपमुख्यमंत्र्यांनी साखर पेरणी केली असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी काँग्रेसच्या या ज्येष्ठांकडून कसा प्रतिसाद मिळणार हे लक्षवेधी ठरणार आहे.

Story img Loader