श्रीरामपूरला निवडणुकांची उरली औपचारिकता
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने आता निवडणुकीत पूर्वीसारखी चुरस राहिली नसून तो राजकीय औपचारीकतेचा भाग बनल्याचेच स्पष्ट होऊ लागले आहे. ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करावे, या मागणीसाठी कडीत खुर्द व कडीत बुद्रुक या गावांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.
कडीत खुर्द व कडीत बुद्रुक या दोन्ही गावची लोकसंख्या दोन हजारांपेक्षा कमी आहे. ग्रामपंचायतीचे विभाजन करावयाचे झाल्यास प्रत्येक गावची लोकसंख्या कमीत कमी दोन हजारांपेक्षा जास्त असायला हवी, असा ग्रामीण विकास खात्याचा नियम आहे. पण दोन्ही गावांतील गावकरी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी अडून बसले आहेत. स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास विकासकामांना गती मिळते. तसेच निधी मोठय़ा प्रमाणात मिळतो असे त्यांचे म्हणणे आहे. कडीत ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन्ही गावच्या गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तहसीलदार अनिल पुरे यांनी गावकऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी गट विकास अधिकारी परिक्षीत यादव यांनी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी दोन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येची गरज असते त्यामुळे ते शक्य नाही, असे स्पष्ट केले होते. पण, गावकऱ्यांना हे मान्य नाही. त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. आज एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे गाव कमालपूर येथे एका जागेची पोटनिवडणूक होती. ती एकच अर्ज आल्याने
बिनविरोध झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी सभापती इंद्रनाथ थोरात व काँग्रेसचे नेते माजी सभापती आबासाहेब थोरात यांच्या उक्कलगाव या गावात नेहमीसारखी असलेली चुरस यावेळी दिसून आली नाही. १३ जागांसाठी ५९ अर्ज दाखल झाले. काँग्रेसचे थोरात हे निवडणुकीच्या प्रक्रियेत उतरण्यास फारसे राजी नव्हते. माजी आमदार जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी तेथे हस्तक्षेप केल्याने आता काँग्रेसची शिवसेना, शेतकरी संघटना यांच्याबरोबर युती होऊन निवडणूक लढविली जात आहे. तेथे एक जागा बिनविरोध झाली आहे. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने तेथील चुरस मतदानापूर्वीच कमी झाली आहे.
युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांच्या गुजरवाडी गावात सात जागांसाठी १५ अर्ज दाखल झाले आहेत. तेथेही अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव एक जागा बिनविरोध झाली आहे. माळवाडगाव व उंदिरगाव येथील निवडणुका मागील वेळेस बिनविरोध झाल्या होत्या. आता माळवाडगावला नऊ जागेसाठी ४३ अर्ज, तर उंदिरगावला १५ जागांसाठी ९५ अर्ज दाखल झालेले आहेत.
काँग्रेसच्या ताब्यात माळवाडगाव, भोकर, गुजरवाडी, दत्तनगर, भैरवनाथनगर व शिरसगाव या मोठय़ा ग्रामपंचायती आहेत, तर राष्ट्रवादीच्या ताब्यात उक्कलगाव ग्रामपंचायत आहे. अन्य ठिकाणी राजकीय पक्षांची लेबल पदाधिकाऱ्यांना असली तरी स्थानिक पातळीवरील
राजकारणाचे संदर्भ आहेत. आदर्श गाव कान्हेगावची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तेथे सात जागांसाठी १३ अर्ज दाखल झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर तब्बल साठ वर्षांपेक्षा अधिक काळ हे गाव तंटामुक्त राहिले असून यंदा त्यांना पुरस्कारही मिळाला आहे. १३
गावांतील १४५ जागांसाठी ६९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले
आहेत.