वारकऱ्याची पताका भगवी, त्यागाचे प्रतिक असलेली, अहंकाराला तेथे थारा नसतो, उणीदुणी नसतात पण श्रीक्षेत्र सराला बेटावर विकास कामाच्या भूमीपूजनासाठी राजकारण्यांची मांदियाळी जमा झाली. त्यांनी एकमेकांवर शरसंधान केले. वारकऱ्यांच्या व्यासपीठावरही त्यांच्या मनात एकमेकांबद्दल असलेली अढी तसूभरही कमी झालेली दिसली नाही. उलट सांकेतिक भाषेत एकमेकांवर पलटवार करण्यात त्यांनी धन्यता मानली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमीपजन झाले. कार्यक्रम सरकारी होता की संस्थानने आयोजित केला होता हे कोडे उलगडलेच नाही. माजी आमदार जयंत ससाणे व राष्ट्रवादीचे सिद्धार्थ मुरकुटे यांच्यात नेहमी संघर्ष सुरू असतो. पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याबरोबर मुरकुटे आले. श्रेय मिळविण्यासाठी व्यासपीठावरच त्यांचा सुरू असलेला आटापिटा अनेकांनी पाहिला. निधीचे श्रेय मिळविण्यात ससाणेंना यश आले. वारकऱ्यांच्या व्यासपीठावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भजबळांचा सत्कार केला. भुजबळांबरोबर ससाणे आले. ससाणे यांनी स्वागत केले. आमदार असुनही भाऊसाहेब कांबळे यांना दुर्लक्षित केले गेले. त्यांना साधे आभारही मानू दिले गेले नाही. तशी दक्षता घेतली गेली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या वाटय़ालाही असेच वागणे सुरूवातीला आले. पण त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यांचा आक्रमक पावित्रा पाहून त्यांना भाषणाची संधी देण्यात आली. वैजापूरचे आमदार आर. एम. वाणी यांनाही कांबळेंप्रमाणेच वागवण्यात आले.
कार्यक्रमात वाकचौरे यांनी येवल्याचा निधी थोडा कमी करून तो बेटाला द्यावा अशी सुचना केली. भजबळ यांनी वाकचौरे यांच्यावर भाषणात कडी करत तुम्ही एक वर्षांचा सर्व निधी बेटाला द्या, अशी सुचना केली. पाचपुते यांनी भाऊसाहेब कांबळे यांचे व माझे नाते चांगले आहे. त्यामुळे विकास कामांसाठी मदत करील. कांबळे हे मुरकुटे व ससाणेंना बरोबर घेऊन काम करतात. दोन्ही नेते भांडतात. पण, कांबळेंना सर्व कसे बरोबर जमते असे विचारले. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात हे अनुपस्थित राहीले. तर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे हे कार्यक्रम संपल्यानंतर आले.  महंत रामगिरी महाराज यांनी बेटाची सत्रे हाती घेतल्यानंतर विकासकामांचा धडाका चालविला आहे. पहिल्या कार्यक्रमात राजकारण्यांना सांभाळताना त्यांना मोठी कसरत करावी लागली. भाषणात कुणाचे नाव राहणार नाही, याची दक्षता घेतली. त्यांच्या कुशलतेमुळेच राजकारणाची छाप कार्यक्रमावर पडली नाही. मोठय़ा कौशल्याने त्यांनी वारकऱ्यांचा हा कार्यक्रम राहील याची दक्षता घेतली. त्याला यशही आले. राजकारण्यांचे एकमेकांवरचे राजकीय वार साध्या भोळ्या वारकऱ्यांच्या लक्षातही आले नाही.

Story img Loader