आजच्या तरुणाईचा प्रेरणास्रोत चुकल्याने त्यांना इतिहास, त्यातील सन्माननीय व्यक्ती, त्यांनी केलेला त्याग, शौर्य याबाबत अनास्था आहे. त्याचा फायदा घेत सद्य:स्थितीत महापुरुषांच्या विचारांचा सोयीस्कर अर्थ लावत राजकारण तथा समाजकारण केले जात आहे. आपण इतिहासापासून प्रेरणा घेऊ शकत नाही. तर, किमान त्याच्या गळ्याला नख तरी लावू नका, असे आवाहन नितीन डांगे-पाटील यांनी केले.
येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘छत्रपती शंभूराजे’ या विषयावर डांगे- पाटील यांनी पुष्प गुंफले. देश निर्माण करायचा असेल तर डोक्यात राज्यघटना व हातात संभाजी राजांना धरून चालले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. संभाजी महाराजांचे वर्णन करताना त्यांनी कुलभूषण, संस्कृतपंडित अशा उपाध्यांचा वापर केला. संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिले. त्यांनी काही कविताही लिहिल्या. त्यांना १८ भाषा अवगत होत्या. एकदा एका प्रकांडपंडितांच्या कीर्तनात त्यांनी संस्कृतची चूक हेरली. कीर्तन संपताच त्यांनी
ती लक्षात आणून दिली. असे असताना महाराजांच्या अनेक गोष्टी समाजापासून लपविण्यात आल्या. त्यांच्याविषयी ज्या गोष्टी खऱ्या नाहीत त्या इतिहासात दाखविल्या गेल्या. यामुळे खऱ्या अर्थाने संभाजी राजे आपल्यापर्यंत पोहोचलेच नाहीत.
त्यासाठी इतिहासाच्या मुळाशी जाऊन त्याची माहिती घेतली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
सईबाईंच्या मृत्यूपश्चात जिजाऊ व शिवरायांनी संभाजी राजांना वाढविले. शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप त्यांच्यावर कायम राहिली. आठव्या वर्षीच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. तोपर्यंत त्यांनी युद्धकला आत्मसात केली होती. संभाजी महाराजांनी कधी मद्य घेतले नाही. त्यांनी पोर्तुगीजांकडून जे दोन पिंप दारू घेतल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. ते पिंप तोफेच्या दारूचे आहेत हे मात्र कधी कोणी सांगितले नाही, याबद्दल डांगे-पाटील यांनी खेद व्यक्त केला. इतिहासातील काही समजुती ज्या संभाजी महाराजांचा द्वेष करण्यास कारण ठरल्या. त्यात एक म्हणजे ते दिलेरखानला जाऊन मिळाले होते. परंतु शिवाजी महाराजांनी त्यांना तसे करण्यास
प्रवृत्त केले, असा इतिहास कधीच कोणी सांगत नाही. बदलत्या परिस्थितीत मुलांवर चांगले संस्कार घडविण्याची गरज आहे. यासाठी पालकांनी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Story img Loader