अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबागांवर सातत्याने विपरीत परिणाम होत आहे. औषध फवारणीच्या माध्यमातून द्राक्ष बागा वाचविण्यात काही शेतकऱ्यांना यश आले असले, तरी समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या बाबत राजकीय मंडळींनी चुप्पी ठेवल्याने दाद कोणापुढे मागायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी पाणी टंचाईचा सामना करत शेतकऱ्यांनी आपली पिके जगविली. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने द्राक्ष पिकांना पोषक स्थिती राहिली. मात्र, महिनाभरापासून पाऊस, थंडी यामुळे द्राक्ष पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. त्यात खत-औषध विक्रेत्यांनी कीटकनाशक फवारणीच्या किमती तीनपट वाढविल्याने शेतकरी कोंडीत सापडले आहेत. द्राक्ष वाचविण्यासाठी विविध प्रकारची महागडी औषध फवारणी करून त्यांनी पिके वाचविली असली, तरी त्यावर बराच खर्च झाला. परिणामी, द्राक्षाच्या किमतीत काही अंशी वाढ झाली. मात्र अद्याप बाजारपेठेत द्राक्षाला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वैतागलेल्या काही शेतकऱ्यांनी तर द्राक्ष बागा काढण्यास सुरुवात केली आहे. या बाबत बोलताना द्राक्ष शेतकरी केशव शेलार यांनी थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे गेल्याचे सांगितले. रोगास बळी पडणारे पीक वाचविण्यासाठी औषध फवारणी केली. त्यामुळे मजुरी वाढली. मात्र त्या खर्चाच्या प्रमाणात अद्याप मोबदला मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. शेलार यांच्याप्रमाणे बहुसंख्य शेतकऱ्यांची अवस्था आहे. द्राक्ष बागा वाचविण्यासाठी त्यांनी जीव तोडून प्रयत्न केला. त्यासाठी खर्चातही मोठी वाढ झाली, परंतु अपेक्षित भाव नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाल्याचे दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा