वीर लढवय्या शिवा काशिदने लाखांचा पोशिंदा असलेल्या छत्रपती शिवरायांसाठी आपले बलिदान दिले. शिवाजी महाराजांनी भोसल्यांसाठी राज्य न करता रयतेचे राज्य केले. शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना सामान्यांचे प्रश्न सोडविले. त्याचा आदर्श ठेवून आजच्या राज्यकर्त्यांनी रयतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी किल्ले पन्हाळा येथे शनिवारी बोलताना केले. यावेळी नाभिक समाजाच्या महामंडळासाठी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून जागा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पन्हाळा येथे वीर शिवा काशिद स्मारकाचा लोकार्पण सोहळा व नाभिक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शरद पवार यांच्या हस्ते स्मारकाचा लोकार्पण सोहळा मोठय़ा थाटामाटात पार पडला. नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या राज्य शासन निश्चित पूर्ण करेल, असेही ते म्हणाले. नाभिक समाजाचे वैशिष्टय़ नमूद करताना पवार म्हणाले, आपले काम सुरू असताना दुसऱ्याचे मत बनविण्याचे काम नाभिक समाज करीत असतो. अशा समाजाच्या कार्यक्रमाला बोलविले असताना निवडणुकीच्या सुगीच्या काळात नाही म्हणता यायचे नाही. आमची आघाडी तुमच्यासोबत आहे, असा उल्लेख केल्यावर सभास्थळी चांगलाच हस्या पसरला.
बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी नेबापूर येथे उभारलेल्या वीर शिवा काशिद स्मारकाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा करताच त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ते म्हणाले, येत्या पंधरा दिवसात स्मारकाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. पन्हाळगडावर जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. पर्यायी मार्गाचे सव्र्हेक्षण झाले असून दोन किलो मीटरच्या रस्त्याला २ कोटी रुपये खर्च येणार आहे. हे काम शासन तातडीने मार्गी लावेल. इतर मागासवर्गीय समाजातील लोकांनी जातीची उतरण थांबविली पाहिजे. समाजातून भेदाभेद नष्ट होत असताना या कृतीची गरज असल्याचे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी नेबापूर व बुधवार पेठ या ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. कार्यक्रमास कामगारमंत्री हसन मुश्रीफ, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार निवेदिता माने, धनंजय महाडिक आदी उपस्थित होते.
राज्यकर्त्यांनी रयतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे -पवार
वीर लढवय्या शिवा काशिदने लाखांचा पोशिंदा असलेल्या छत्रपती शिवरायांसाठी आपले बलिदान दिले. शिवाजी महाराजांनी भोसल्यांसाठी राज्य न करता रयतेचे राज्य केले. शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना सामान्यांचे प्रश्न सोडविले.
First published on: 02-02-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politicians solve problem of public sharad pawar