आंतरराष्ट्रीय धावपटू ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत सह मोनिका आथरे, अंजना ठमके, दुर्गा देवरे, दत्ता बोरसे, किसन तडवी, सुरेश वाघ यांसारखी पलटणच्या पलटण देशांतंर्गत विविध मैदाने आपल्या कामगिरीने अक्षरश: गाजवू लागल्यामुळे नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक्स क्षेत्र राष्ट्रीय पातळीवर प्रसिध्दीस आले. कोणत्याही क्षेत्रात प्रसिध्दीबरोबर ‘शह-काटशह’ चा जो खेळ सुरू होतो, त्यास जिल्हा अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रही अपवाद राहिलेले नसून त्याचा अनुभव जिल्हा अ‍ॅथलेटिक संघटनेशी संबंधित काही जणांना नुकताच आला. या अनुभवामुळे ही मंडळी अतिशय व्यथित झाली आहेत.
कविता राऊतच्या साखरपुडय़ानिमित्त बंगळूरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात कविताबरोबर सराव करणाऱ्या सुधा सिंगचे नाशिक येथे आगमन होणार होते. लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये सहभागी झालेली एक अ‍ॅथलीट नाशिक नगरीत येत असल्याचे निमित्त साधून एकाने जिल्हा संघटनेच्या वतीने सुधाचा सत्कार करण्याची योजना मांडली. सुधाच्या नात्यातील एक जण भोसला विद्यालयात शिकत असल्याने त्या अनुषंगाने सुधाशी बऱ्यापैकी ओळख निर्माण झालेल्या या व्यक्तीच्या प्रस्तावास जिल्हा संघटनेशी संबंधित काही जणांनी तत्काळ मान्यता दिली. १८ फेब्रुवारी रोजी साखरपुडय़ाचा कार्यक्रम असताना सुधा आदल्या दिवशीच नाशिकमध्ये येणार हीती. त्यामुळे १७ फेब्रुवारी रोजी तिच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले. संबंधित व्यक्तीने सुधाशी मोबाईलवरून संपर्क साधत सत्काराविषयी कल्पना दिली. सत्कारानंतर तिला हरसूल येथे पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. सुधाने त्यासाठी होकार दर्शविला. सर्वकाही सुरळित होत असल्याने आणि सुधासारख्या अनुभवी खेळाडुकडून काही टीप्स नाशिकच्या युवा खेळाडुंना मिळू शकतील, या अपेक्षेने कार्यक्रमाच्या तयारीस संबधित व्यक्ती लागली. परंतु १६ फेब्रुवारीच्या रात्री सुधाने मोबाईलवरून त्या व्यक्तीशी संपर्क साधत अचानक आपले काम निघाल्याने आपण नाशिकला येऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.
सुधाचे नाशिक येणेच रद्द झाल्याने संबंधिताने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला नाही. कविताच्या साखरपुडय़ाचे आमंत्रण त्या व्यक्तीसही असल्याने १८ फेब्रुवारी रोजी ती व्यक्ती हरसूल येथे पोहोचली, आणि तिथे कार्यक्रमात सुधा सिंग उपस्थित असल्याचे पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला. सुधाच्या सत्काराचा कार्यक्रम होऊ नये म्हणून संघटनेशी संबंधित कोणीतरी जाणीवपूर्वक हे सर्व घडवून आणल्याची त्या व्यक्तीची भावना आहे. नाशिकच्या अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात सर्व काही व्यवस्थित चालल्याचे दिसत असले तरी परिस्थिती तशी नसल्याची जाणीवही या व्यक्तीने करून दिली आहे. सत्कार स्वीकारण्यास प्रारंभी सुधाने होकार दर्शविणे, नंतर दौराच रद्द झाल्याचे सांगणे आणि तरीही हरसूलला उपस्थित राहाणे या सर्व घडामोडीदरम्यान निश्चितच काहीतरी राजकारण शिजल्याचा संबंधिताचा आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा