पूरग्रस्तांच्या दु:खाच्या तव्यावर पक्षांतर्गत गटबाजीची पोळी शेकून घेण्याचा अश्लाघ्य प्रकार काँग्रेसमधील एका गटाने काल रविवारी येथे केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याची सवय जडलेल्या येथील नेत्यामुळेच सर्वसामान्यांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचे व पोलिसांनाही लाठीशिवाय दुसरी भाषा येत नसल्याचे या प्रकरणातून दिसून आले आहे.
शहरातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत असताना पालकमंत्र्यांच्या ताफ्यावर भिरकवण्यात आलेले दगड व त्यानंतर पोलिसांनी केलेला लाठीमार केवळ काँग्रेसच्या गटबाजीच्या राजकारणातून घडला. या जिल्ह्य़ात गेल्या अनेक वर्षांंपासून काँग्रेसचे दोन गट सक्रीय आहेत. पालकमंत्री संजय देवतळे यांच्या गटाला कायम विरोध करणारा दुसरा गट कुरघोडीचे राजकारण करताना पूरग्रस्तांनाही सोडत नाही, हे काल दिसून आले. कुरघोडीच्या या राजकारणाची सुरुवात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून झाली. या दौऱ्यात हे दोन्ही नेते शहरी व ग्रामीण भागाची पाहणी करणार होते. ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागाचा दौरा रद्द केला. हा दौरा रद्द करण्यात देवतळे यांचा हात असल्याचा संशय विरोधी गटाने तेव्हा व्यक्त केला होता. मुख्यमंत्री ग्रामीण भागात जाणार नाही, हे कळताच या गटाने येथील वरोरा नाका चौकात मोठय़ा संख्येने पक्षाचे कार्यकर्ते जमवले व मुख्यमंत्र्यांचा मार्ग रोखून धरण्याची योजना आखली. सारे शहर पुराने त्रस्त असताना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अशा योजना आखण्याचे राजकारण या गटाने केले. तेव्हाच काँग्रेसच्या या नेत्यांना पूरग्रस्तांविषयी काही देणे घेणे नाही, तर केवळ मुख्यमंत्र्यांनी आपली दखल घ्यावी, हा एकमेव मतलबी हेतू असल्याचे दिसून आले होते.
पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असलेला दुसरा गट मात्र मुख्यमंत्र्यांना ग्रामीण भागात जाऊ देण्यापासून कसे रोखले, हे सांगण्यात व्यस्त झाला होता. कुरघोडीच्या राजकारणाला नेमकी येथूनच सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात झालेल्या फजितीचा वचपा काढण्यासाठी आतूर असलेल्या विरोधी गटाने अखेर काल संधी शोधली. गनिमी काव्यांना मागे टाकेल, असा सापळा त्यासाठी रचण्यात आला. पूरग्रस्त भागांची पाहणी करणारे पालकमंत्री सिस्टर कॉलनीत जाणार नव्हते. तरीही त्यांना पद्धतशीरपणे तेथे बोलावण्यात आले. यासाठी पुन्हा पूरग्रस्तांचाच वापर करण्यात आला.
पालकमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या फौजाही या कॉलनीत तैनात करून ठेवण्यात आल्या होत्या. कुणी दगड मारायचा, कुणी अर्वाच्य भाषेत बोलायचे, हे सर्व आधीच ठरवण्यात आले होते. त्यासाठी इतर वॉर्डातील कार्यकर्त्यांची फौज येथे आणून ठेवण्यात आली होती. त्यात देवतळेंसोबत असलेल्या आणि वाचाळवीर म्हणून प्रसिध्द असलेल्या माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांनी पूरग्रस्तांसाठी वापरलेल्या अपशब्दांनी आणखी भर घातली. त्यातून उडालेल्या ठिणगीने नंतर पेट घेतला.
अखेर ठरलेला बेत तडीस गेल्यानंतर काँग्रेसचे नेते आता देवतळेंची कशी जिरवली, या आनंदात मग्न असले तरी कुरघोडीच्या या राजकारणाचा फटका मात्र गेल्या चार दिवसांपासून पुराच्या पाण्यात कसेबसे दिवस काढणाऱ्या सामान्य नागरिकांना बसला आहे. पोलिसांच्या लाठीमाराचा फटका बसलेले शेकडो पूरग्रस्त आधी मनावर व आता अंगावर झालेल्या जखमा कुरवाळत बसले आहेत. याच पूरग्रस्तांपैकी ७० नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने आता शासनाची मदत मिळण्याआधीच त्यांना पोलीस ठाण्यात चकरा माराव्या लागत आहेत. येथील पोलीस अधिकाऱ्यांना लाठी चालवण्याशिवाय दुसरी कोणतीही भाषा अवगत नसल्याचे अनेक प्रकरणात दिसून आले आहे. काल त्यात आणखी भर पडली. मृत्यू आणि दु:खाचे राजकारण करू नये, असा संकेत आहे. तो काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी पार पायदळी तुडवला आहे. या नेत्यांमुळेच या शहराची पार वाट लागली आहे. राज्यातले सर्वात बकाल शहर, अशी चंद्रपूरची ओळख झाली असून नेते राजकारणात व्यस्त आहेत.
बदनामीच्या कटात पोलीसही सामील
कामचुकार व लाचखोर, अशी ओळख असलेले येथील पोलीसही पालकमंत्र्यांच्या बदनामीच्या कटात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी पूरग्रस्तांच्या नावावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वरोरा नाका चौकात धरणे दिले. त्यांना हटवण्याऐवजी त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देण्यात येथील पोलीस प्रमुखाने धन्यता मानली व विमानतळावर तशी माहिती देऊन एका गटावरील निष्ठेचा परिचय दिला. काल रविवारी देवतळे सिस्टर कॉलनीत जायला तयार नव्हते. मात्र, येथील गिरनार चौकाशी निष्ठावंत असलेल्या वाहतूक शाखेतील पुंडलिक सपकाळे या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना या कॉलनीत नेले व नंतर समोरचा राडा घडला. पोलिसांच्या या कर्तबगारीची तक्रार आता पालकमंत्री गटाने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.