मान्यताप्राप्त शिक्षक नसल्याच्या कारणास्तव विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश घेण्यास मनाई केलेल्या महाविद्यालयांवरून विद्यार्थी संघटनांनी राजकारण सुरू केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न ३३८ महाविद्यालयांवर प्रवेश बंदी घालण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण संचालकांच्या दबावामुळे अथवा त्यांच्याकडे असलेल्या मान्यताप्राप्त शिक्षकांची नावे कळल्यानंतर यादीतून काही महाविद्यालयांची नावे वगळून विद्यापीठाने ही संख्या २५८ महाविद्यालयांवर आणली. त्यात पुन्हा त्यांनी आठ महाविद्यालयांची नावे वगळली म्हणजे विद्यापीठाच्या लेखी केवळ २५० महाविद्यालयांमध्ये शिक्षक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे प्रकरण विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे व महाविद्यालयीन शाखेचे असताना त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना स्वारस्य घेत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी मनसेने त्या आठ महाविद्यालयांचे नाव यादीतून का हटवले म्हणून ओरड केली तर शिवसेनेच्या विद्यार्थ्यांनी याच आठ महाविद्यालयांचे नाव वगळण्यावरून स्टंटबाजी चालविली आहे. एकमेकांना शह देण्याचे राजकारण करणाऱ्या या विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मात्र तेवढय़ा आक्रमक दिसून येत नाहीत. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे, प्रवेशाचे कितीतरी प्रश्न अव्हेरून केवळ राजकारण करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न दिसून येत आहे. आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुलसचिवांना निवेदन सादर केले. दरम्यान विद्यापीठाने वजा केलेली ती आठ महाविद्यालये रायसोनी आणि वंजारी शिक्षण समूहाची आहेत. संचालकांच्या दबावामुळेच ती वगळण्यात आल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.

Story img Loader