कार्यकर्त्यांत मनभिन्नता असली तरी ‘मते अनेक, निर्णय एक’ ही लातूर जिल्हय़ात भाजपची ओळख आहे. सर्वाचा विचार घेऊन सहमतीचे राजकारण भाजपत केले जाते असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. जो तो आपल्या मनाला येईल तसे निर्णय घेतो व त्याला अनुमती घेतली होती असा मुलामा चढवतो.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ८८व्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर भाजप जिल्हाध्यक्षाची निवड पक्ष कार्यालयात करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी जिल्हा सरचिटणीस नागनाथ निडवदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रक वर्तमानपत्रांच्या कार्यालयात पोचते न पोचते तोच दुसऱ्या गटाकडून ही निवडच कशी अवैध आहे, याची माहिती देणारे दूरध्वनी खणखणू लागले.
जिल्हाध्यक्षांच्या निवडीचे होर्डिग एकीकडे जिल्हाभरात झळकत असतानाच दुसरीकडे एका गटाने जिल्हा कार्यालयालाच टाळे ठोकून संताप व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रूपाताई पाटील निलंगेकर, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव पाटील निलंगेकर, उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषदेचे गटनेते रामचंद्र तिरुके, जिल्हा सहनिवडणूक अधिकारी देवीदास काळे आदी उपस्थित, तर माजी आमदार पाशा पटेल, रमेश कराड, गोविंद केंद्रे, जिल्हा निवडणूक अधिकारी ज्ञानोबा मुंडे ही मंडळी अनुपस्थित होती.
नागनाथ निडवदे हे रा. स्व. संघाचे प्रचारक होते. भाजपत अनेक वर्षांपासून ते सक्रिय राहिले. शिस्तीचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. पक्षात चांगले पद मिळण्याची संधी येऊनही पक्षश्रेष्ठींचा आदेश व शिस्तीच्या स्वभावामुळे त्यांना गप्प बसावे लागले. या वेळेला पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून त्यांच्या समर्थकांनी गनिमी कावा साधला व त्यांची निवड केली. ही निवड करताना भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष संभाजी पाटील यांनी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावून ‘कृष्णनीती’ वापरून निडवदे यांची निवड करण्यात यश मिळविले. त्यांच्या विरोधी गटाने कोणत्याही स्थितीत ही निवड रद्द व्हावी यासाठी चंग बांधला आहे. माजी आमदार पाशा पटेल, गोविंद केंद्रे, रमेश कराड यांच्यासह पक्षातील एक गट निलंगेकर यांच्या निर्णयप्रक्रियेवर नाराज आहे. त्यामुळे त्यांनी या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.
माजी आमदार पटेल हे खासदार गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत. नाव जरी पटेल असले तरी त्यांचे पक्षातील मंडळींपेक्षा पक्षाबाहेरच्या लोकांशीच अधिक पटते, अशी त्यांच्यावर सातत्याने टीका होते. माजी आमदार गोविंद केंद्रे हे त्यांचा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर व त्यांनी प्रतिष्ठा लावून ज्यांना आमदार केले त्यांच्याशी पटेनासे झाल्यानंतर आपले अंग काढून घेतले असल्याची टीका होते आहे. पक्षातील दोन गट आपापला गट सक्रिया करण्यात गुंतले आहेत. दोघे मिळून पक्षाचे संघटन वाढावे यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत नाही. भाजप हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. पक्षात मतदानापेक्षा सहमतीच्या राजकारणावर अधिक भर असतो. मते अनेक असली तरी निर्णय एक होते, असे पुस्तकी विधान सातत्याने केले जाते. मात्र, उक्ती व कृती यातील अंतर दिवसेंदिवस वाढत असल्याचे कार्यकर्ते सिद्ध करीत आहेत. सहमतीचे राजकारण हा शब्दप्रयोग वारंवार वापरला जात असला, तरी निर्णयप्रक्रियेत वापरली जाणारी ‘मती’ गुंग करून टाकणारी आहे.
जिल्हय़ातील दहाही तालुक्यांच्या अध्यक्षांची तोंडे दाही दिशेला आहेत. या सर्वाची तोंडे एका दिशेला व्हावीत, यासाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. मुळात भाजपत विठ्ठलांची संख्या वाढत असल्यामुळे कोणाच्या पायावर डोके ठेवावे, यासाठी भक्त संभ्रमित झाले आहेत. ‘असुनी नाथ मी अनाथ’ असे कार्यकर्त्यांना म्हणण्याची वेळ आली आहे. एकेकाळी ‘नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’ अशी चांगली स्थिती होती. दुर्दैवाने नाथांच्याच घरचे वातावरण बिघडले असल्यामुळे पांडुरंग नाचण्यासाठी घर शोधतो आहे, अशी अवस्था आहे.     
संघटनेपेक्षा नेत्याचा आधार
एकेकाळी कार्यकर्त्यांला संघटना आपला आधार वाटत होती. आपल्या अडचणीच्या काळात पक्ष आपल्या पाठीशी राहील, यावर त्याला विश्वास होता. आता चित्र बदलत असून पक्षापेक्षा नेताच आपल्या पाठीशी राहील. त्यामुळे नेता जो सांगेल तसेच मी वागेन यावर भर देणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे

Story img Loader