एव्हरेस्ट एण्टरटेन्मेण्टच्या ‘तुकाराम’ या चित्रपटाची प्रसिद्धी ‘माणूसपण जपणारा संत’ अशी केली होती. ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटात वरवर राजकारणाची पाश्र्वभूमी हाताळली असली, तरी राजकारण्यांमधील माणूसपण दाखवण्याचा दिग्दर्शकाचा हेतू साध्य होतो..
राजकीय सारीपाट, सत्तास्पर्धा, कुरघोडीचे राजकारण हे विषय मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि महाराष्ट्रातील लोकांसाठीही नवीन नाहीत. ‘सिंहासन’, ‘सामना’, ‘वजीर’ अशा जबरदस्त निर्मितीमूल्य असलेल्या चित्रपटांनी या राजकीय चित्रपटांची एक परंपरा निर्माण केली. ही परंपरा पुढे विस्कळीत झाली, हे आपले दुर्दैव म्हणावे की सुदैव, हा वादाचा विषय होऊ शकतो. मात्र ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाची जाहिरात सुरू झाल्यानंतर, अनेक दिवसांनी एखादा राजकीय पट येणार, अशा आनंदात अनेक लोक होते. या सर्वानाच एक शहाणपणाचा सल्ला आहे. एक राजकीय चित्रपट किंवा सत्तास्पर्धा दाखवणारा चित्रपट म्हणून हा चित्रपट पाहायला जाऊ नका. पदरी निराशा पडण्याचा संभव आहे. मात्र राजकारण्यात दडलेला माणूस, नोकरशाही आणि राजकारणी यांच्यातील संघर्ष, मंत्रालयातील कामाची पद्धत या गोष्टींच्या कसोटीवर या चित्रपटाला शंभरपैकी शंभर मार्क देता येतील. पण चित्रपट पाहताना कुठेतरी ‘सिंहासन’ची आठवण येत राहते, हे नक्की!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते (सचिन खेडेकर) यांची उचलबांगडी होणार आणि त्यांच्या जागी प्रतापराव पाटील (सुनील तावडे) मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, या बातम्यांनी चित्रपटाची सुरुवात होते. मात्र अचानक आलेल्या बातमीनुसार सीएमची खुर्ची शाबूत राहते आणि प्रतापरावांचे आराखडे धुळीला मिळतात. राज्यातील राजकीय कुरबुरी दिल्लीत जाऊन मिटवत सीएम मुंबईत दाखल होतात आणि खऱ्या अर्थाने चित्रपट सुरू होतो. सीएमच्या दिवसभरातील कार्यक्रमांमध्ये रात्री उशिरा असलेल्या चीफ जस्टिसच्या (सतीश आळेकर) मुलाच्या लग्नसमारंभात एक घटना घडते. त्यामुळे सीएम अस्वस्थ होतात. मंत्रालयातील फायलींच्या ढिगाऱ्यात गाडले गेलेले एका सामान्य माणसाचे काम एका रात्रीत करून देण्याचा निश्चय करतात. हे काम होते का, त्यामध्ये कोणत्या प्रशासकीय अडचणी येतात, अशा कोणत्या कारणामुळे सीएमला हे काम रात्रीतच व्हायला हवे आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि राजकारण, सरकारी काम, सीएमचे दैनंदिन आयुष्य या सगळ्यांचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी तरी हा चित्रपट एकदा पाहायलाच हवा.
चीफ जस्टिसच्या मुलाच्या लग्नसमारंभात घडलेली घटना म्हटली तर खूप क्षुल्लक वाटू शकते. सीएम आल्यानंतर जस्टिस त्यांची ओळख करून देत असताना शहरातील सर्वच ‘हूज हू’ उठून उभे राहतात. मात्र वाईचे सुप्रसिद्ध गायक गुंजकर आपल्या जागी बसूनच राहतात. सीएमना हा आपला अपमान आणि गुंजकर यांचा उद्दामपणा वाटतो आणि ते भर समारंभात गुंजकर यांचा पाणउतारा करतात. मात्र गुंजकर हे अंध असल्याने ते आपल्या जागेवरून उठू शकले नाहीत, या वास्तवाची जाणीव झाल्यानंतर सीएमला अस्वस्थ वाटू लागते.
या प्रसंगाची मीमांसा करणे जास्त महत्त्वाचे वाटल्याने ही पुढील वाक्ये! वरवर पाहता आपल्या आयुष्यात ही घटना घडली, तर आपण माफी मागून विसरून जाऊ. पण सीएम हे सीएम आहेत आणि माफी मागण्याची सवय त्यांना नाही. ‘बूंद से गई, सौ हौद से नहीं आती’ हे खरे असले, तरीही सीएमच्या पदाला शोभेल अशीच परतफेड सीएम करतील. त्यासाठी आपल्या अधिकारांचा वापरही करतील. सीएमचे सीएमपण लक्षात घेतल्यानंतर मग ही घटना क्षुल्लक वाटत नाही, आणि त्याबाबत सीएमला होणारा पश्चात्तापही अनाठायी वाटत नाही.
पटकथा लेखक अजित दळवी आणि प्रशांत दळवी या दोघांनीही चित्रपटाचा बाज अत्यंत कुशलपणे सांभाळला आहे. या चित्रपटात सतत दिसूनही सीएमपुढे झाकोळले गेलेले आणि तरी स्वत:चे अस्तित्व ठसवणारे पात्र म्हणजे सीएमचा स्वीय साहाय्यक पी. डी. शिंदे (हृषीकेश जोशी). ‘सिंहासन’मधील ‘रांगणेकर’ या पात्राची आठवण करून देणारा रिसोर्सफुल शिंदे दळवीद्वयीने मस्त उभा केला आहे. काही वाक्ये तर अगदी झक्कास जमून आली आहेत. ‘मिसेस सीएमने सीएमच्या आधी तयार राहायला हवे, हादेखील प्रोटोकॉलच ना!’ हे किंवा ‘सग्यासोयऱ्यांच्या आगळीकीमुळे आतापर्यंत किती मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, हे तुम्हाला ठाऊक नाही का,’ हे अश्विनी भावे यांच्या तोंडी असलेले वाक्य, ‘राज्याच्या कानाकोपऱ्यातून कामासाठी आलेल्या माणसांना आम्ही तोंडावर नाही सांगतो, म्हणूनच मंत्रालयाचे महत्त्व ५० वर्षांनंतरही टिकून आहे,’ हे साटम (समीर चौघुले) या मंत्रालयातील कर्मचाऱ्याने त्याच्या बायकोला ऐकवलेले वाक्य, ‘सनदी अधिकाऱ्यांना मिळणारी मोठय़ात मोठी शिक्षा म्हणजे बदली, तीदेखील बढती होऊन. एकवेळ मुख्यमंत्र्याला शिक्षा होऊ शकते, पण सनदी अधिकाऱ्यांना नाही,’ या आशयाचे सीएमच्या तोंडचे वाक्य, बागवे (आनंद इंगळे) या अंडरसेक्रेटरी पदावर असलेल्या कर्मचाऱ्याचा बारमधील संवाद हे अक्षरश: नमुने आहेत. त्याशिवाय सीएम आणि प्रधान सचिव रहिमतपूरकर (महेश मांजरेकर) यांच्यातील संवाद म्हणजे तर या चित्रपटाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. त्याशिवाय फक्त मंत्रालयातच वापरले जाणारे परवलीचे शब्दही चांगले पेरले आहेत.
चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळली आहे. प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी ही मंडळी पत्रकारितेच्या मांडवाखालून गेल्याचा फायदा चित्रपट करताना झाला आहे, हे नक्कीच जाणवते. सीएमचे व्यग्र वेळापत्रक, चीफ जस्टिसच्या घरी चालू असलेल्या मैफिलीच्या पाश्र्वभूमीवर होणारी सीएमची तगमग, बागवे, मुनीर (पुष्कर श्रोत्री), साटम अशी उभी केलेली अस्सल पात्रे कुलकर्णी यांच्यातील दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून देतात. कर्तव्यदक्षता बजावताना सीएमच्या मागे असलेली यशवंतराव चव्हाण यांची फ्रेम खूप काही बोलून जाते. फक्त काही प्रसंगांमध्ये पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीचा विसर कुलकर्णी यांना पडला का, अशी शंका येते. खासकरून रात्री पावणेतीन वाजता सीएम मंत्रालयात येतात त्या वेळी मंत्रालयाबाहेर एक पत्रकार चहा पीत उभा असतो. तो आपल्या कार्यालयात फोन करून ‘पान एकला माझ्यासाठी जागा ठेव, एवढय़ा रात्री सीएम मंत्रालयात, म्हणजे नक्कीच काहीतरी बातमी असणार’, असे सांगतो. हा प्रसंग हास्यास्पद आहे. रात्री पावणेतीन वाजेपर्यंत कोणत्याही वर्तमानपत्रात काम चालत नाही, हे कुलकर्णी व दळवी यांना जाणवायला हवे होते. त्याचबरोबर चित्रपटाच्या शेवटी सीएम एका झोपडपट्टीबाहेर कोणत्याही सुरक्षेविना उभे आहेत, हेदेखील थोडेसे खटकते. मात्र ‘ड्रॅमॅटिक लिबर्टी’च्या आधारे हे शक्य होऊ शकते.
या चित्रपटात फक्त दोन गाणी आहेत. मंगेश धाकडे यांनी पाश्र्वसंगीत दिले असून राजकीय पाश्र्वभूमीवरील चित्रपटाला ते साजेसे आहे. अशोक पत्की यांनी या चित्रपटातील एक गाणे संगीतबद्ध केले आहे आणि तेच गाणे सर्वात जास्त भाव खाऊन जाते. विशेष म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावरील झळाळता तारा असलेल्या जयतीर्थ मेवुंडी यांनी ते गायले आहे.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कलाकारांनी वठवलेल्या भूमिका! सचिन खेडेकरने सीएमची भूमिका अत्यंत प्रभावीपणे आणि हुबेहूब वठवली आहे. सीएम पदाच्या काही खास लकबी, सवयी, प्रोटोकॉलचे ओझे, पक्षांतर्गत विरोधकांचा हसत हसत घेतलेला समाचार, त्यांचे पीएबरोबरचे नाते या सगळ्याच गोष्टी सचिनने झक्कास जमवून आणल्या आहेत. त्याखालोखाल लक्षात राहते ते हृषीकेश जोशी याने साकारलेले शिंदे याचे पात्र! सीएमची काळजी करणारा, त्यांचे हितसंबंध जपणारा पीए, रात्रीचा दिवस करताना घरासाठी मात्र वेळ न देऊ शकणारा बाप व नवरा आणि केवळ आपल्या साहेबाच्या पॉवरच्या जोरावर शासकीय यंत्रणा कामाला लावणारा कर्मचारी या सगळ्याच छटा त्याने उत्तम दाखवल्या आहेत. महेश मांजरेकर यांनी साकारलेला रहिमतपूरकर हा सनदी अधिकारीही अगदी मंत्रालयातून उचलून कॅमेऱ्यासमोर उभा केल्यासारखा वाटतो. आपल्या बुद्धिमत्तेचा अहंकार, ती राज्यकर्त्यांसमोर वाकवायला लागत असल्याबद्दलची घुसमट आणि सरकारी नोकरीतील थंडपणा मांजरेकर यांनी बरोब्बर पकडला आहे. पुष्कर श्रोत्रीचा मुनीर खूप चांगला जमला असला, तरी त्याचे हिंदी अगदीच मुळा-मुठाकाठचे वाटते. आनंद इंगळे या रसायनाला कोणत्याही पात्रात टाकले तरी तो ते पात्र जिवंत करतो. बागवे याचे पात्र आनंदने त्याच खुबीने सांभाळले आहे. त्याशिवाय समीर चौघुले, सतीश आळेकर, चंद्रकांत लिमये यांच्या भूमिकाही चांगल्या जमल्या आहेत.
राजकारणाच्या घबडग्यात अडकलेल्या एका राजकारण्यात दडलेल्या सामान्य माणसाची कथा म्हणून हा चित्रपट पाहायला गेलात, तर हाती खूप काही लागू शकते. मात्र केवळ राजकीय संघर्षांची कहाणी म्हणून हा चित्रपट बघितलात, तर पदरी निराशेशिवाय काहीच नाही, हे लक्षात ठेवा!
एव्हरेस्ट एण्टरटेन्मेण्ट व व्हाइट स्वान प्रोडक्शन प्रस्तुत
‘आजचा दिवस माझा’
निर्माती – पूजा छाब्रिया
दिग्दर्शक – चंद्रकांत कुलकर्णी
पटकथा – अजित दळवी आणि प्रशांत दळवी
छायाचित्रण – राजन कोठारी
संगीत – मंगेश धाकडे आणि अशोक पत्की
गायक – जयतीर्थ मेवुंडी
कलाकार – सचिन खेडेकर, अश्विनी भावे, महेश मांजरेकर, हृषीकेश जोशी, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, समीर चौघुले, चंद्रकांत लिमये, सतीश आळेकर आणि अखिलेंद्र मिश्रा.
माणूसपण जपणारा राजकारणी!
एव्हरेस्ट एण्टरटेन्मेण्टच्या ‘तुकाराम’ या चित्रपटाची प्रसिद्धी ‘माणूसपण जपणारा संत’ अशी केली होती. ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटात वरवर राजकारणाची पाश्र्वभूमी हाताळली असली, तरी राजकारण्यांमधील माणूसपण दाखवण्याचा दिग्दर्शकाचा हेतू साध्य होतो..
First published on: 31-03-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politisation who maintain humanity