रंकाळा तलाव प्रदूषणप्रश्नी प्रशासनास जाग यावी व प्रशासनाने रंकाळा प्रदूषण मुक्त करून गतवैभव  प्राप्त करून द्यावे, या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी आंदोलकांनी आणलेले रंकाळा तलावातील प्रदूषित पाणी महापालिकेच्या चौकात ओतले.  
    ‘प्रशासन बसले गप्प रंकाळा झाला हिरवागार,’ ‘बचाव बचाव रंकाळा बचाव’ या घोषणांनी आंदोलकांनी महापालिका चौक दणाणून सोडला. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, की हा तलाव राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने कोल्हापूरला दिलेली देणगी आहे. पण प्रशासनामुळे आज तलावाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. येथील नागरिकांना येथे राहणे मुश्किल झाले आहे. साथीचे रोग पसरण्याची भीती येथील नागरिकांच्यात निर्माण झाली आहे. इतकी वाईट परिस्थिती येईपर्यंत गप्प बसणाऱ्या निष्क्रिय प्रशासनाचा निषेध करत रंकाळ्याच्या पिछाडीस असणाऱ्या परताळ्यात बांधकाम करण्यास परवानगी कोणी दिली? असा प्रश्न उपस्थित केला.  तर याबाबत लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत अन्यथा हजारोंच्या संख्येने शिवसनिक महापालिकेस घेराव घालून सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांना महापालिकेतच आडवू, असा इशारा दिला.   
   यावेळी निवेदन स्वीकारताना आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी उपनगरातील सांडपाण्यामुळे रंकाळ्याच्या प्रदूषणात भर पडत आहे. हे थांबवण्यासाठी रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी थांबविण्यासाठी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच बोट चालू करून पाणी फिरते ठेवण्य्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पंिपग मशीन सुरू करून लवकरात लवकर रंकाळा तलावास गतवैभव प्राप्त करून देऊ, असे आश्वासन दिले.