उद्योगातून निघणारा विषारी धूर, वीज केंद्राच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारी फ्लाय अॅश, वेकोलिच्या कोळसा खाणी, सिमेंट कारखाने व जळावू कोळशासोबतच रात्रंदिवस धावणाऱ्या अडीच ते तीन हजार ट्रक्सच्या वाहतुकीमुळे या शहराचा चेहरामोहरा अक्षरश: काळवंडला आहे. नीरी व आयआयटी पवईच्या संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आली असून त्यामुळेच चंद्रपूर देशातील चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर झाले आहे.
या जिल्ह्य़ात बल्लारपूर पेपर मिल, एसीसी, अंबूजा, अल्ट्राटेक, माणिकगड व मुरली हे पाच सिमेंट कारखाने, एमईएल, सिध्दबली, ग्रेस, गुप्ता व अन्य पोलाद उद्योग, दारूगोळा कारखाना, महाऔष्णिक विद्युत केंद्र, धारीवाल व वर्धा पॉवर, तसेच भविष्यात येऊ घातलेले अनेक खासगी वीज प्रकल्प, वेकोलिच्या ३० कोळसा खाणी आणि एमआयडीसीतील छोटय़ा-मोठय़ा उद्योगांमुळे हा जिल्हा प्रदूषित झाला आहे.त्यामुळे देशात चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर, अशी चंद्रपूरची ओळख झाली आहे. दिवसरात्र धावणाऱ्या अडीच ते तीन हजार ट्रक्समुळे या शहराचा संपूर्ण चेहराच काळवंडल्याची धक्कादायक माहिती नीरी व आयआयटी पवईचे शास्त्रज्ञ डॉ.बिनीवाले व डॉ. राकेशकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान सचिव आर.ए.राजू, विभागीय आयुक्त वेणूगोपाल रेड्डी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव मित्तल, जिल्हाधिकारी डॉ.म्हैसेकर, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक व्ही.एम. मोटघरे उपस्थित होते.
नीरीचे व आयआयटी पवईचे डॉ.बिनीवाले व डॉ.राकेशकुमार यांनी केलेल्या अभ्यासानुसार विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक उद्योग असलेल्या या शहरात तीन हजार ट्रक्स २४ तास धावतात. या शहरात पाच प्रमुख ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून प्रत्येकाकडे किमान ३००-४०० ट्रक्स आहेत. या पाचही ट्रान्सपोर्टचे ट्रक्स फ्लाय अॅश वाहून नेणारे बल्कर व आठ ते दहा चाकांचे मोठे ट्रक जिल्ह्य़ातील उद्योगांमध्ये धावतात. यात सिमेंट व कोळसा वाहून नेतांना काही नियम व अटी आहेत, परंतु हे व्यावसायिक कायदाच धाब्यावर बसवत असल्याचे यानिमित्ताने समोर आलेआहे.
ट्रक्समुळे ३० टक्के प्रदूषण होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. वेकोलिच्या खाणीतून कोळसा भरलेला ट्रक घेऊन जातांना ताडपत्री झाकणे आवश्यक असताना ते होत नाही, तसेच बहुतांश ट्रान्सपोर्ट व्यावसायिक ओव्हरलोड वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.
शहर वाहतूक शाखेच्या नोंदीनुसार घुग्घुस, गडचांदूर, चंद्रपूर, ताडाळी, राजुरा, कोरपना, गोंडपिंपरी, भद्रावती, वरोरा व मूल येथे औद्योगिक झोन असल्याने येथे सर्वाधिक ट्रक वाहतकू आहे. तसेच गडचांदूर, चंद्रपूर, घुग्घुस व वणी येथेहीे ट्रक्सची वाहतूक सर्वाधिक आहे. या जिल्ह्य़ातील हे सर्व तालुके प्रदूषित झोन म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे चंद्रपूर, घुग्घुस, वणी व ताडाळी येथे तर कुठल्याही नवीन उद्योगाला बंदी घातली आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक केरोसीनचा वापरत असल्याने ट्रक्समधून निघणारा विषारी धूर या शहरातील लोकांचे आयुष्यमान कमी करत असल्याचा निष्कर्षही या शास्त्रज्ञांनी काढला आहे. चंद्रपूर वीज केंद्रातून नेण्यात येणारी फ्लाय अॅश वाहून नेतांना राख उडत असल्यामुळे ऊर्जानगर ते घुग्घुस व ऊर्जानगर ते गडचांदूर हा संपूर्ण रस्ताच प्रदूषित झालेला आहे.
या ट्रक्सची वाहतुक शहराच्या मुख्य मार्गानेच होते. ओव्हरलोड ट्रक्सच्या वाहतुकीमुळे होणारे हे प्रदूषण बघता ही वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी काही पर्यावरणप्रेमींनी केली आहे, परंतु त्याकडे लक्ष देण्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा जिल्हा पोलिसांनाही वेळ नाही.
प्रदूषणामुळे चंद्रपूरचा चेहरामोहराच काळवंडला
उद्योगातून निघणारा विषारी धूर, वीज केंद्राच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारी फ्लाय अॅश, वेकोलिच्या कोळसा खाणी, सिमेंट कारखाने
First published on: 22-10-2013 at 08:43 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution chaged the face of chandrapur