प्रदूषणामुळे इरई, झरपट व वर्धा या प्रमुख नद्यांचे पात्र कोरडे पडल्याने शहरात रामाळा तलाव वगळता गणेश विसर्जन कुठे करायचे, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे, तर राजुरा, बल्लारपूर, कोरपना, जिवती, भद्रावती, वरोरा तालुक्यातील गणेश मंडळांनाही हीच समस्या भेडसावत आहे. दरम्यान, जिल्हा व मनपा प्रशासनाव्दारे वेकोलिच्या पोकलॅन मशिनव्दारे इरई नदीचे पात्र सफाई अभियान हाती घेतले असून, इरई धरणातील पाणीही सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जुन, जुलै व ऑगस्ट असे सलग तीन महिने अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाल्यानंतरही जिल्ह्य़ातील नद्या कोरडय़ाठाण आहेत. जिल्ह्य़ातील उद्योगांच्या अतिक्रमणामुळे जवळपास २५ उद्योग या नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करत आहेत. त्यामुळे आता राजुरा, बल्लारपूर, गडचांदूर, गोंडपिंपरी या तीन तालुक्यातील गणेश मंडळांना विसर्जनाची समस्या निर्माण झाली आहे. तेथील नगर प्रशासनाने नद्यांमध्येच विसर्जनाची सक्ती केली असली तरी काही मंडळांनी गावतलावाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर झरपट व इरई नदीत पाणी नसल्याने चंद्रपुरातील गणेश मंडळांनाही विसर्जनाची समस्या भेडसावत आहे. नागपूर मार्गावरील पडोली ते शांतीधाम स्मशानभूमीपर्यंत इरई नदीच्या पात्रात पाणीच नाही. मध्ये थोडे पाणी असले तरी तेथून पुढे पठाणपुरा गेटपर्यंत पाणी नाही. नदीच्या पात्रात सर्वदूर रेती आहे. यावर्षी सलग चार वेळा पूर आल्याने नदी पात्रात इतक्या मोठय़ा प्रमाणात रेती आली असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.
मनपा आयुक्त प्रकाश बोखड यांनी शनिवारी इरई नदीचे पात्र सफाई अभियान हाती घेतले होते. त्यासाठी जेसीबी मशिनही मागविल्या. परंतु, नदीचे पात्रात रेती भरपूर असल्याने या मशिन काम करत नसल्याची माहिती त्यांनी लोकसत्ताला दिली. त्यामुळे आता जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर व आयुक्त बोखड यांनी वेकोलिकडे पोकलॅन मशिनची मागणी केली आहे. आज सायंकाळी, तसेच उद्या दिवसभर मशिन लावून नदीचे पात्र साफ करणार असल्याचे बोखड म्हणाले. नदी साफ केली तरी विसर्जनासाठी पात्रात पाणी नसल्याने ते आणायचे कुठून, असा प्रश्न केला असता इरई धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने इरई धरणात ८० टक्के पाणी साठा आहे. मात्र, ऑगस्टपासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाणीसाठय़ात एक टक्काही वाढ झालेली नाही. त्यामुळे आता पाणी सोडले आणि नंतर पाऊस झालाच नाही तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही नगरसेवकांनी धरणाचे पाणी सोडण्यास विरोध केला आहे.
रामाळा तलावात शहरातील दीड ते दोन हजार गणेश मूर्तीचे विसर्जन केले, तर अख्खा तलाव प्रदूषित होणार आहे. वरोरा, भद्रावती व चिमूर येथील गणेश मंडळांसमोरही हाच प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, वर्धा नदी वरोरा व भद्रावती या दोन शहरातून वाहते, तर चिमुरातून वाहणाऱ्या नदीलाही पाणी नाही. हीच समस्या मूल व सावली तालुक्यातील गणेश मंडळांनाही आहे. सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाल्यानंतरही या शहराला ही समस्या भेडसावत आहे. केवळ नद्यांचे पात्र प्रदूषित झाल्यामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे.