बदलापूरमध्ये विभागप्रमुखाचा शिवसेनेला घरचा आहेर
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासन तसेच सत्ताधाऱ्यांविषयी असलेली नाराजी लक्षात घेऊन बदलापूरमधील शिवसेना विभागप्रमुख शैलेश वडनेरे यांनी त्यांचा वाढदिवस चक्क खड्डे भरून साजरा करीत सत्ताधारी सेनेला एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील इतर शहरांप्रमाणेच बदलापूर शहरातील रस्त्यांचीही खड्डय़ांमुळे अक्षरश: चाळण झाली असून त्यांची डागडुजी करण्यात पालिका प्रशासनास अपयश आले आहे. या पाश्र्वभूमीवर वडनेरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकवर्गणी काढून किमान आपल्या परिसरातील खड्डे बुजविण्याचा निर्णय दत्तवाडी परिसरातील शिवसैनिकांनी घेतला. त्यानुसार दत्तवाडी ते गांधी चौक परिसरातील खड्डे सोमवारी बुजविण्यात आले. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची डागडुजी होत नसल्याचे कारण पालिका प्रशासन देत होती. मात्र आता पाऊस कमी झाल्याने किमान गणपतीपर्यंत प्रशासनाने शहरातील रस्त्यांची डागडुजी करावी, अन्यथा त्या त्या परिसरातील नागरिक आपापल्या विभागातील खड्डे स्वखर्चाने भरून त्याचे बिल पालिकेकडे पाठवतील, असा इशारा वडनेरे यांनी दिला आहे.

Story img Loader