महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना विद्यालयाच्या रचना इको क्लबच्यावतीने दिवाळीतील वाढते वायू प्रदूषण लक्षात घेऊन त्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रदूषण (फटाके) मुक्त दिवाळी अभियान राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी सामूहिक शपथ घेतली.
याप्रसंगी मुख्याध्यापिका मंगला धाडणकर, उपमुख्याध्यापिका सुचेता येवला, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उल्हास कुटे, रचना इकोक्लब प्रमुख निलेश ठाकूर, वैशाली कुलकर्णी  उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत आहे, याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यात आली. त्यातील अनेक कारणांपैकी वायू प्रदूषण हे एक कारण आहे. फटाक्यातून कार्बन, कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन यांचे होणारे प्रदूषण, फटाक्यामुळे हवेच्या प्रदूषणात होणारी वाढ, ध्वनी प्रदूषण, प्राणी-पक्ष्यांना होणारा त्रास, क्षणार्धात फटाक्यांच्या रुपाने लाखो रुपयांचा होणारा चुराडा या पर्यावरण असंतुलित करणाऱ्या गोष्टींची जाणीव इको क्लबने करून दिली.
वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू, या कृतीतून बचत होणारे पैसे मी विधायक कामांसाठी म्हणजे गरजू मित्र, अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांना उपयुक्त भेटवस्तू देण्यासाठी वापरेन.
ही कृती मी माझ्यापुरती मर्यादित न ठेवता यात घरातील सदस्य, शेजारी, नातेवाईक व परिसरातील नागरिक यांच्यापर्यंत पोहचवेल असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.