अलीकडेच झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे डाळिंबासारख्या फळपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला असतानाच या अस्मानी संकटातून थोडय़ा फार प्रमाणात तग धरलेल्या डाळिंबाच्या फळांवर आता चोरटय़ांची वक्रदृष्टी पडू लागल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. चोरटय़ांपासून या बागांचे रक्षण करण्यासाठी त्यांना डोळ्यात तेल घालून रात्र-रात्र जागरण करण्याची वेळ आली आहे.
कमी पाणी, अतिपाऊस, उष्णता, अतिथंडी, ढगाळ वातावरण यासारखी परिस्थिती डाळिंब फळ पिकांवर विविध प्रकारच्या रोगांसाठी आमंत्रण देणारी ठरत असते. यंदाच्या वर्षांत अशा सर्वच प्रकाराच्या प्रतिकूल स्थितीला डाळिंबाच्या पिकांना सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे फवारणी व अन्य स्वरूपाच्या वाढीव खर्चाचा भार शेतकऱ्यांना सोसावा लागला. त्यातच नुकत्याच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे बहुसंख्य फळबागा खराब झाल्या. या तडाख्यातून थोडय़ा फार प्रमाणात जी फळे वाचली, त्यांना जतन करून एकदाची ती बाजारात कशी जातील यासाठी शेतकरी धडपड करीत असल्याचे चित्र दिसून येते. या परिस्थितीत एका बाजूला शेतकरी हतबल झाला असतानाच बागांमध्ये काही प्रमाणात शिल्लक असलेल्या डाळिंबाची फळेही आता सुरक्षित नसल्याने त्यांच्यापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत.
सध्या किलोमागे १०० रुपयांपर्यंतचा भाव डाळिंबाला मिळत आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास ही फळे चोरण्याचा उद्योग चोरटय़ांनी आरंभला आहे. गेल्या काही दिवसात हे प्रकार वाढत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे चोरटय़ांपासून बागांचे संरक्षण करण्यासाठी मोठय़ा शेतकऱ्यांनी पहारेकरी नियुक्त केले आहेत तर ऐपतीअभावी लहान शेतकऱ्यांना रात्रभर स्वत:ला जागता पहारा द्यावा लागत आहे. तालुक्यातील पाटणे येथील पंडित महादू अहिरे यांच्या शेतात पहाटेच्या सुमारास अशा प्रकारे एका गोणीत डाळिंब घेऊन पळून जाणाऱ्या दोघांना गावकऱ्यांनी पकडले. गंगाराम रामसिंग सोनवणे व अशोक दुसन पवार अशी या चोरटय़ांची नावे असून ते दोघेही स्थानिक रहिवासी आहेत. गावकऱ्यांनी त्यांना तालुका पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

Story img Loader