देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील आलिशान गाडय़ा विकत घेण्याची परंपरा यावर्षीही नवी मुंबईने कायम ठेवली असून, केवळ दहा माहिन्यांत ७५ लाखांपेक्षा जास्त किमतीच्या १४ गाडय़ांची नोंद नवी मुंबई आरटीओने केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात एक कोटी ६२ लाखांच्या रेंज रोवर या आलिशान गाडीची नोंदणीही नवी मुंबईच्या नावावर आहे.
तीन वर्षांपूर्वी चार कोटीच्या बेन्टलीची नोंदणी या शहरात झालेली आहे. गाडय़ांच्या या नोंदणी स्पर्धेत आरटीओचे उत्पन्न वाढत असून ते जानेवारीपर्यंत १६५ कोटींवर गेले आहे.
मुंबईत आलिशान गाडय़ांच्या संख्येला काही कमतरता नाही. बॉलीवूड आणि मोठय़ा उद्योजकांमुळे मुंबईत बेन्टली, गॅलडो, हॅमर, रोल्स रॉईस या गाडय़ा पाहण्यास मिळतात. पूर्वी श्रीमंतीचे लक्षण मानल्या जाणाऱ्या मर्सिडीज आता तर मुंबईत पदोपदी दिसून येतात. मर्सिडीजनंतर ऑडी, बीएमडब्लूचीही संख्या वाढली आहे. इतिहास असणाऱ्या मुंबईचे हे लक्षण ठीक आहे, पण ४० वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या नवी मुंबईतही आता आलिशान गाडय़ांची वानवा नाही. गतवर्षी जानेवारी महिन्यात दोन जग्वार आणि दोन मर्सिडीज बेन्झ गाडय़ांची नोंदणी झाली होती. या चारही गाडय़ांची किंमत एक कोटी रुपयांच्या घरात आहे.
फेब्रुवारी माहिन्यात ७५ लाखांपेक्षा जास्त किमतीची गाडी कोणीही खरेदी केलेली नाही. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याच्या काळात म्हणजेच मार्च माहिन्याच्या शेवटच्या दिवशी ८० लाखापर्यंतच्या दोन मर्सिडीज खरेदी करण्यात आल्या होत्या. गतवर्षी शहरात सहा मर्सिडीज, तीन बीएमडब्लू, तीन जग्वार, एक ऑडी आणि एक रेंज रोवर खरेदी करण्यात आली आहे. जी-५५ श्रेणीतील एक मर्सिडीज एक कोटी ३० लाखांची आहे, तर त्यावरील २६ लाखांचे नोंदणी शुल्क धरून ही गाडी एक कोटी ५६ लाखांपर्यंत जात आहे. जवळपास तेवढय़ाच किंमतीची रेंज रोवर आहे. दोन वर्षे २५ लाख रुपये किमतीच्या ६४ पेक्षा जास्त गाडय़ा विकल्या गेल्या होत्या. चालू आर्थिक वर्षांत ही संख्या १०० गाडय़ांपेक्षा जास्त आहे.
नवी मुंबईतील दरडोई उत्पन्न १३ हजार ५०० रुपये आहे. त्यामुळे दुचाकी वाहन घेणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. एप्रिल ते जानेवारी या दहा माहिन्यांत १४ हजार ५७५ दुचाकी नोंद झाल्या असून, या काळात चार चाकी वाहनांची संख्या मात्र रोडावली आहे. गतवर्षी पेक्षा ५८२ कार कमी नोंदल्या गेल्या आहेत. तरीही टॅक्सी, रिक्षा, स्कूल बस ट्रेलर यामुळे शहरात २९ हजार १९२ वाहनांची भर पडली आहे. यातून नवी मुंबई आरटीओच्या तिजोरीत १६५ कोटी ६५ लाख १४ हजार १७४ रुपये आजमितीस जमा झाले असून, मार्चपर्यंत ही रक्कम वाढण्याची शक्यता असल्याचे नवी मुंबईचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले. गेल्यावर्षीपेक्षा दहा कोटी रुपयांनी या विभागाचे उत्पन्न वाढले आहे हे विशेष.
गेली तीन वर्षे हे उत्पन्न सातत्याने वाढत असून तीन वर्षांपूर्वी ही रक्कम केवळ १३६ कोटी रुपये होती. राऊत यांनी नोंदणी पद्धत अंत्यत सुलभ आणि पारदर्शक केल्याने नवी मुंबईत वाहन नोंदणी (वास्तव्याचा दाखला क्रमप्राप्त) करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी उरण, पनवेल हे तालुके याच विभागात होते. या भागात जमिनी विकून मुबलक पैसा आल्याने गाडय़ा घेणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. पनवेल आरटीओ झाल्याने तेथील नोंदणी कमी झाली पण त्याचा म्हणावा तसा परिणाम नवी मुंबई आरटीओवर झालेला नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांची गाडय़ा घेण्याची हौस मात्र आजही कायम असल्याचे दिसून येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा