राहुल भगतला मदतीचा हात हवा
अजनी ग्रीन व्हू कॉलनीतील ८ बाय ८ ची भाडय़ाची खोली..समोर थोडासा उंचवटा करून पोत्यांनी व प्लास्टिक झाकून आईने स्वयंपाकासाठी तयार केलेले स्वयंपाकघर..मातीच्या भुसभुशीत भिंती..तिन्ही ऋतुंमध्ये त्रासदायक. वडील राजेश भगत भाजीपाला विकतात म्हणून ठिकठिकाणी भाजीपाला ठेवलेला आणि कुबट वातावरणामुळे उग्र वास अशा वातावरणात राहून गरिबीचे चटके सोसत राहुलने दहावीत ९४ टक्के गुण मिळवले. घराच्या बाजूला पहिलवानचा दर्गा प्रसिद्ध आहे. त्याच्या परिसरात एक पथदिवा आणि त्याच्याखाली एका बाकडय़ावर बसून रात्री ११.३०पर्यंत राहुल अभ्यास करायचा.
नववीची परीक्षा झाल्यावर चुलत बहिणीची पुस्तके आणून उन्हाळ्याच्या दोन महिन्याच्या सुट्टीत त्याने ती वाचून काढली. खाजगी शिकवणी लावण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे पुस्तकांची पुनरावृत्ती करणे, अडचणी शिक्षकांना किंवा भाऊ स्नेहदीप शेळके यांना विचारून तो प्रश्न सोडवित असे. शाळा व जेवण आटोपून जाटतरोडीतील शेळके यांच्या खोलीवर जावून दुपारी तीन ते रात्री नऊ पर्यंत राहुल अभ्यास करायचा. घरी परतल्यावर जेवणानंतर वडील भाजी विकून येईपर्यंत रात्री ११.३० पर्यंत अभ्यास करायचा. त्याला एकटय़ाला कसे बसू द्यायचे म्हणून आईही सोबत करायची. आई देखील एका घरी परिचारिकेचे काम करते.
एवढे सर्व परिस्थितीचे चटके सोसत राहुलने ९४ टक्के गुण मिळवले मात्र, तो समाधानी नाही. पेपरचे मूल्यांकन व्यवस्थित न झाल्याचे त्याला वाटते. कारण त्याच्या माहितीतल्या अनेक विद्यार्थ्यांचे गुण पुनर्मूल्यांकनात वाढले. पैसे नसल्याने तो पुनर्मूल्यांकन करू शकला नाही. राहुल म्हणतो, रोज १२ तास अभ्यास करायचो. नववीनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीतच पुस्तके वाचून काढली. नोव्हेंबरमध्ये त्याचा दहावीचा अभ्यास तोंडपाठ होता. एकेका विषयासाठी वीसवीस वेळा उजळणी केली. एकेक पुस्तक चाळीसदा वाचले होते. परीक्षेत सर्व विषयांचे सर्व अतिरिक्त प्रश्नही सोडवले. घरी येऊन स्वत:चे मूल्यांकन करताना कमीत कमी गुण देऊन मला ९८ टक्के गुण मिळतील, अशी खात्री होती. पण फक्त ९४ टक्के गुण मिळाले.
अभ्यासाबरोबरच प्रश्नमंजुषा आणि फुटबॉलमध्ये त्याा विशेष रस आहे. शाळा व जिल्हा स्तरावर तो फुटबॉल खेळायचा. आठवीपासून प्रश्नमंजुषेत भाग घेऊ लागला. ४०च्यावर प्रश्नमंजुषा जिंकल्या. रोख बक्षिसे मिळाली. सोबतच पुस्तके, प्रमाणपत्रे, ट्रॉफी, सुवर्णपदके घरात विखुरलेली आहेत. त्यांना ठेवायला जागा नसल्याने शेळके यांच्या खोलीवर ती नेऊन ठेवली आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘टाटा क्रुशिबल इंजिनिअरिंग’ या प्रश्नमंजूषेत प्रेक्षकांतर्फे त्यांनी भाग घेतला. त्यात त्याला ‘टाटा फोटॉन प्लस’ उपकरण मिळाले. मात्र, लॅपटॉप वा संगणकच नसल्याने ते नुसते पडून आहे. फुटबॉल, प्रश्नमंजुषेसह नाटक, शिष्यवृत्ती परीक्षा, वादविवाद, वक्तृत्व किंवा कुठलीही स्पर्धा घ्या. त्यात राहुलला हमखास रस असतो. त्याला कमी गुण मिळाल्याची खंत आईलाही आहे. राहुलने खूप मेहनत घेतली होती. त्याला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. खाऊला दिलेले पैसेही खर्च न करता साठवतो. त्याला गरज पडली तेव्हाच तो खर्च करतो. जे दिले ते खातो. कशाचा अनावश्यक हट्ट करीत नाही. त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याच्या शिक्षणासाठी दर महिन्याला थोडेसे पैसे बाजूला टाकते. पण, सामाजिक संस्था किंवा दानशूरांनी मदत दिली तर त्याचे उच्च शिक्षण पूर्ण करता येईल.
अंतराळवीर व्हायचंय
राहुलला आकाशाचे फारच आकर्षण आहे. त्याला अंतराळ आवडतं. आकाशात खूप काही रहस्य दडल्याचं त्यांना वाटतं. माणूस अजूनही त्या रहस्यांपासून अनभिज्ञ आहे. म्हणूनच राहुलला अंतराळवीर व्हायचंय. त्याने अकरावीच्या द्विलक्षी अभ्यासक्रमात अर्ज केला होता. सेमिनरी हिल्सवरील एसएफएस हायस्कुलमध्ये त्याचा क्रमांक लागला आहे. राहुल म्हणतो, प्रत्येक वर्षी परिस्थितीशी संघर्ष करून गुण मिळवले. यापुढेही असाच संघर्ष करावा लागेल. बिकट परिस्थितीतून वाट काढून पुढे जाण्यातच खरा आनंद आहे.