अतिशय आवश्यक असतानाही सुमारे पाच वर्षे काम रखडल्यामुळे गाजलेल्या बुटीबोरीच्या रेल्वे उड्डाणपुलावर एक वर्षांतच भगदाड पडल्यामुळे या पुलाच्या बांधकामाबाबत शंका निर्माण झाली आहे.
मुंबई-हावडा आणि नवी दिल्ली-चेन्नई हे वर्दळीचे रेल्वेमार्ग बुटीबोरीहून जातात. या मार्गावर दोन्ही दिशांनी दिवसातून शंभरहून अधिक रेल्वेगाडय़ा ये-जा करत असल्यामुळे बुटीबोरीचे रेल्वेफाटक कित्येक वेळ बंद राहत असे आणि त्यामुळे वाराणशी-कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर नागपूरहून जाम, चंद्रपूर मार्गाने हैदराबादकडे जाणाऱ्या, तसेच दुसरीकडे नागपूरहून वर्धा, यवतमाळ मार्गे औरंगाबादकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहनांचा बराच वेळ खोळंबा होई. त्यामुळे येथे रेल्वे उड्डाणपूल व्हावा, अशी नागरिकांची कित्येक वर्षांपासूनची मागणी होती, परंतु त्याकडे सतत दुर्लक्ष झाले. अखेर ही मागणी पूर्ण होऊन रेल्वे उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली, मात्र त्याचे बांधकाम जवळजवळ पाच वर्षे रखडले होते. एव्हाना लोकांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि उड्डाणपूल ठराविक काळात बांधून पूर्ण न झाल्यास आम्हीच त्याचे उद्घाटन करू, असा इशारा अनेकांनी दिल्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते. सरतेशेवटी ८ ऑक्टोबर २०११ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला एकाच बाजूची वाहतूक सुरू करण्यात येऊन दरम्यान दुसऱ्या बाजूचे बांधकाम पूर्ण करून काही दिवसांनी संपूर्ण पूल वाहतुकीला खुला झाला.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील हा पूल असल्याने त्याचे बांधकाम मानकानुसार आणि दर्जेदारच असेल, हे अपेक्षित होते, परंतु उड्डाणपुलाचे बांधकाम दीर्घकाळ रेंगाळल्याने लोकांच्या भावना क्षुब्ध झाल्या व त्यामुळे बहुधा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर दडपण येऊन हे काम घाईघाईत पूर्ण करण्यात आले, असे वाटायला लावणारी चिन्हे दिसत आहेत. बांधकाम जरी दर्जेदार झाले, तरी घाईमुळे ते वाळण्यासाठी (क्युअरिंग) पुरेसा वेळ न देण्यात आल्यामुळे असे होऊ शकते, असे मत एका स्थापत्य अभियंत्याने व्यक्त केले.
दोन महिन्यांपूर्वी या पुलाच्या मध्यभागी, वर्धेहून नागपूरकडे येताना डावीकडील बाजूला भेगा पडल्या, तसेच सुमारे सात फुटांचे मोठे भगदाडही पडले.
हा मार्ग अतिशय वर्दळीचा असल्यामुळे बिघाड त्वरित लक्षात आला. शिवाय, खालीच तेवढाच व्यस्त रेल्वेमार्ग असल्याने त्यावरील रस्त्याला भगदाड पडण्याचे गांभीर्य वाढले. त्याची तातडीने दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
ज्या ठिकाणी भगदाड पडले, त्याच्या लगतचा सुमारे ३० मीटर लांबीचा व चार फूट रुंदीचा काँक्रीटचा भाग फोडण्यात येऊन छिद्राचा भाग रासायनिक पदार्थासह काँक्रीटने बुजवण्यात आला. सुमारे दोन महिन्यांपूर्वी हे काम सुरू करण्यात आले. सध्या काँक्रीट भरण्याचे काम पूर्ण झाले असून वरच्या भागात डांबर टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम येत्या तीन-चार दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
पुलावरून जाताना ही साधी दुरुस्ती दिसत असली, तरी पुलाच्या खालच्या भागात पाहिले असता या बिघाडाचे गांभीर्य लक्षात येते. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या अनेकांनी या पुलासाठी आंदोलने केली, इशारे दिले आणि पुलाला विलंब झाल्याने अनेकांचे हातही ओले झाले, त्यापैकी कुणीही या पुलाला भगदाड पडल्याची दखल घेतलेली नाही. अनेक राजकीय नेते आणि व्हीआयपी या ठिकाणाहून जात असतात, परंतु एका महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामात एका वर्षांच्या आत बिघाड उत्पन्न होतो, याचे गांभीर्य कुणीच लक्षात घेतलेले नाही.    

Story img Loader