देशात कोणाचे सरकार येणार याची गरमागरम चर्चा टीव्ही चॅनल्स आणि लोकांच्यात सुरू असताना पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळपासून ऐरोलीच्या उद्यानात माळीकाम करणारा हिंगोळीचा बोधनन भगत, घणसोलीच्या नाक्यावर रिक्षा उभी करून प्रवाशांची वाट पाहणारा वासुदेव सोनुले, सोसायटीत येणाऱ्या अभ्यांगतावर नजर ठेवणारा सुरक्षारक्षक कोमल पांडे, इस्त्रीचे कपडे घरोघरी पोहचविण्याची लगबग असणारा हरिंदर कनोजिया, पानाचा ठेला उघडून गिऱ्हाईकांची वाट पाहणारा जितेंद्र कश्यप यांसारख्या गरिबांच्या चेहऱ्यावर कसला आला आहे. निवडणुकांचा निकाल अशीच भावना असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे माळीकाम करणाऱ्या बोधनने दिलेली ‘पोटाच्या खळगीसमोर कसलं आलं आहे सरकार’ ही प्रतिक्रिया फार मोठी बोलकी आहे.
जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीच्या १६ व्या लोकसभेचे निकाल शुक्रवारी सकाळपासून येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे निकालाचे उत्सुकता असणाऱ्या नागरिकांनी टीव्हीसमोर ठाण मांडले होते. त्यामुळे नेहमी सकाळपासून वाहनांच्या वर्दळीने भरून जाणारा ठाणे-बेलापूर मार्गावर तुरळक गाडय़ांची रेलचल सुरू होती. नाक्यानाक्यावर असणाऱ्या पोलिसांनी आजूबाजूच्या दुकानदारांकडून खुच्र्या मागून गप्पांचा फड जमविला होता. शेजारच्या उद्यानात पत्नीबरोबर माळीकाम करणाऱ्या बोधननला पत्नीची १ जूनपासून गेलेल्या नोकरीची चिंता सतावत होती. गवत काढायचे काम थांबवून हा बोधनन गटाराच्या एका टाकीवर विचार करीत बसला होता. आता देशात परिवर्तन होणार, मोदी सरकार सत्तेवर येणार, असे सांगितल्यावर त्याने बायकोची नोकरी गेल्याने परत हिंगोलीला जाण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले.
दोघांनी काम केल्यास एका लहानग्याचा या मुंबईत आम्ही सांभाळ करू शकतो. कंत्राटदाराने १ जूनपासून पत्नीला कामावरून कमी केले आहे. त्यामुळे गावाला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे तो म्हणाला. पोटाच्या खळगीसमोर कनचं सरकारबिरकार असं त्याने उद्वेगी उद्गार काढले. नाक्यावर प्रवाशांची वाट पाहणाऱ्या वासुदेव नावाच्या रिक्षावाल्याने येईल ते सरकार आपले असे मत व्यक्त केले. कदाचित प्रवासी हेच त्याचे सरकार असावे, असे भाव त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. एका सोसायटीच्या प्रवेशद्वारावर उभे असणारे सुरक्षारक्षक कोमल पांडे आणि शिवाजी पाटील सकाळी आठ वाजल्यापासून सोसायटीच्या सुरक्षेत व येणाऱ्या जाणाऱ्या अभ्यांगतावर नजर ठेवण्यात व्यग्र होते. त्यामुळे आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीपेक्षा सोसायटीत येणाऱ्या गाडय़ांच्या मोजणीत त्यांचा दिवस जाणार होता. बाजूलाच असणाऱ्या पानाच्या ठेल्याचा माल दर्शनी भागात लावत उभ्या असणाऱ्या जितेंद्र कश्यपने शेजारच्या सलूनमधील टीव्हीवरून देशाचे चित्र बघत असल्याचे सांगितले. जय -पराजयाच्या बातम्याने ठेल्यावराचा माल खपला जाईल, अशी त्याला आशा आहे. घरोघरी इस्त्रीच्या कपडय़ांचे गठ्ठे पोहचविण्याच्या तयारीत असणारा हिरदर कनोजिया कोणते सरकार येणार याबाबत अनभिज्ञ आहे. देशात आलेल्या परिवर्तनाच्या लाटेमुळे ‘बुरे दिन गयो रे भय्या अच्छे दिन आयो रे’ अशीच भावना असल्याचे दिसून येत होते.
व्हाइट हाऊसवर शुकशुकाट
पालकमंत्री गणेश नाईक यांचे सत्ताकेंद्र असणाऱ्या खैरणे एमआयडीसीतील व्हाइट हाऊसवर आज सकाळपासून शुकशुकाट होता. याच ठिकाणी नाईक यांनी आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांच्यासाठी शेकडो बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे या वास्तूवर शुक्रवारी शोककळा पसरली असल्याचे दिसून येत होते.