पावसामुळे बुलढाणा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, नाल्या फुटल्यामुळे घाणपाणी रस्त्यावर येत आहे. शहरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. छोटे-मोठे अंतर्गत रस्ते तर सोडाच , अगदी मुख्य मार्गही खड्डय़ापासून सुटू शकलेला नाही. गत पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर तर शहरातील रस्त्यांची पोलखोलच झाली आहे. रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
शहराचा आत्मा म्हणून ओळखला जाणारा जयस्तंभ चौक खड्डय़ांचे माहेरघरच झालेला आहे सौंदर्यीकरणाच्या नावावर चौकाच्या मधोमध केलेल्या बांधकामामुळे वाहन चालविणे डोकेदुखी ठरत असतांनाच या मार्गावरील खड्डे यात आणखीच भर घालत आहेत. शहरातील कारंजा चौकात शहरातून पाच रस्ते एकत्र येतात मात्र, या रस्त्याबाबत तर न बोललेच बरे. या परिसरात बरीच शासकीय कार्यालये आहेत. मात्र, त्यांच्यासमोरही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. शहरातील संगम चौकातील रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. याच मार्गावरील जुनी प्रशासकीय इमारत, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, परिवहन महामंडळाचे बसस्थानक आहे. हा मार्ग औरंगाबादकडे जात असल्यामुळे नेहमीच वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले ऑटो आणि काळीपिवळी वाहने आणि बसस्थानकासमोरच्या जीवघेण्या खड्डय़ांमुळे नागरिक वैतागले आहेत.
स्टेट बॅंक चौकातून गर्दे वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्डय़ांनी चाळण केली आहे. या मार्गावरील खड्डे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच बुजविण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, पहिल्याच पावसाच्या पाण्यामुळे ते उघडे पडून अधिक मोठे झाले. शहरात बऱ्याच ठिकाणी मार्चच्या शेवटी सिमेंट रस्ते बांधण्यात आले. मात्र, दोनच महिन्यात रस्त्याची वाट लागली. तहसील चौक जाणारा चिखली मार्गावर एडेड हायस्कूल, शारदा ज्ञानपीठ, भारत विद्यालय, विवेकानंद स्कूल, जिजामाता महाविद्यालय, तसेच शासकीय डी.एड. आणि बी.एड. महाविद्यालय आहे. मात्र, हा मार्ग बेशिस्त वाहतुकीचे उत्कृष्ट उदाहरण देते. त्यामुळे रस्ता ओलांडतांना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्रिशरण चौक खामगावकडे जाणाऱ्या मार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. यात चिखली आणि मलकापूर मार्गाचाही समावेश आहे. मात्र, तेथून खामगावकडे जाणाऱ्या मार्गावर वरंवट फाटय़ापर्यंत काही ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडलेले आहेत. ते बुजविण्याबाबत उदासीनता आहे.
शहरातील बऱ्याच भागात खड्डय़ातून रस्ता शोधावा लागतो. गणेशनगर, आयटीआय कॉलनी, सोळंके लेआऊट, सुवर्ण गणेशनगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, मिट्री प्लॉट, भिलवाडा, जुनागाव, संगम चौक, स्टेट बॅंक चौक, क्लब लेआऊट, दलाल लेआऊट, चैतन्यवाडी, लांडे लेआऊट, जिजामातानगर, रामनगर, केशवनगर, एकतानगर, महावीरनगर, सरस्वतीनगर, अष्टविनायकनगर, मच्छी लेआऊट, टिळकवाडी, चोपडे लेआऊट, मुठ्ठे लेआऊट, विष्णुवाडी, इंदिरानगर, शाम टॉकीज परिसर, मशीद चौक, संभाजीनगर, तेलगुनगर भागातील भररस्त्यावर चिखल साचलेला असतो, तर बऱ्याच ठिकाणी नालीचे तुटलेले पूल अपघाताला आमंत्रण देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा