लोकसभेच्या दिंडोरी मतदार संघांतर्गत मनमाड शहर आणि परिसरात गुरूवारी ५० ते ५२ टक्के इतके मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दाट लग्नतिथी, उन्हाचा तडाखा आणि विविध राजकीय पक्षांकडून जनतेचा झालेला भ्रमनिरास, पाणी टंचाई आणि विकास हे मुद्दे या निवडणुकीत ऐरणीवर आले. परिणामी मतदानाचा पारसा उत्साह दिसून आला नाही. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या तर काही केंद्रावर शुकशुकाट होता. अखेरच्या टप्प्यात मात्र जवळपास सर्वच केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागासह मनमाड शहरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ४० ते ४२ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाचा आकडा २० टक्क्यांपर्यंत होता. तर दुपारी दोनपर्यंत ३० ते ३२ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. सायंकाळी पाचनंतर मात्र शहर तसेच ग्रामीण भागातही मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसल्या. बुरकूलवाडी येथे सकाळी साडेअकरापर्यंत २३ टक्के, नागापूर, २६ टक्के, पानेवाडी ३६ टक्के, हिसावळ येथे २४ टक्के मतदान झाले होते. दुपारी दोन वाजेनंतर वडाळी येथे २९ टक्के, लोहशिंगवे ३६, भालूर ३२, मोहेगाव ३४, कऱ्ही ५१, वंजारवाडी ४६ टक्के मतदान झाले. सकाळी १० नंतर मतदार घराबाहेर पडण्यास सुरूवात झाली. हिसवळ येथे एका ८१ वर्षांच्या वृद्धेने आपल्या नातवांसह मतदान केले. शहरात पहिल्या दोन तासांत मतदानाची टक्केवारी सात ते आठ टक्के इतकी होती.
नेहरू भवनामागील प्राथमिक शाळा केंद्र क्र. २०२ ते २०४, क्र. २४७ येथे मतदारांच्या रांगा होत्या. भर बाजारपेठेतील वाचनालयातील मतदान केंद्रावर तुरळक मतदार दिसून आले. सर्वात जास्त ५.७८ टक्के मतदान मरेमा विद्यालयातील एका केंद्रावर झाले. सेंट झेवियर्स हायस्कुलच्या काही केंद्रावर साधारण ४३ टक्के मतदान झाले. बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आला होता.
मनमाडमध्ये निरूत्साहात मतदान
लोकसभेच्या दिंडोरी मतदार संघांतर्गत मनमाड शहर आणि परिसरात गुरूवारी ५० ते ५२ टक्के इतके मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
First published on: 25-04-2014 at 07:16 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poor voting in manmad