महापालिकेचे कंत्राटदार, अधिकारी आणि अभियंत्यांच्या कारभारावर संशयाचे सावट
शहरातील दोन मुख्य रस्त्यांची अवस्था थोडी सुधारली असली तरी अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून पायी चालणे कठीण झाले आहे. पावसामुळे रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असून डांबरीकरणानंतरही रस्ते गायब झाल्याने मनपाचे कंत्राटदार, अधिकारी व अभियंत्यांच्या एकूणच कारभाराविषयी आता सर्वत्र शंका घेण्यास सुरुवात झाली आहे.
या शहरात पूर्वीपासूनच रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्याला कारणीभूत नगरपालिकेचा भोंगळ कारभार आणि तेथील अधिकारी व अभियंते आहेत. आता महानगरपालिका झाल्यानंतर तरी शहरातील रस्त्यांची परिस्थिती सुधारेल, असे वाटत असतांनाच डांबरीकरण झालेले रस्ते सुध्दा पहिल्या पावसात गायब झाल्याचे येथे बघायला मिळत आहे. या शहरातील उत्कृष्ट प्रभाग म्हणून रामनगर, सिंधी कॉलनी, सिव्हील लाईन, वडगाव, साईमंदिर, बिनबा गेट, अंचलेश्वर, बाजार वॉर्ड, शास्त्रीनगर, तुकूम या प्रभागांकडे बघितले जाते. परंतु, याच प्रभागातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. मामीडवार हॉस्पिटल ते साईमंदिर या रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असून पायी चालणेही कठीण झाले आहे. बिनबा गेट ते रामनगर हा रस्ता तर गेल्या कित्येक वर्षांंपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असून मोठ मोठे दगड बाहेर निघाले असल्याने या रस्त्याने जाणे-येणे कठीण झाले आहे. बिनबा गेटलगतच्या शांतीधाम स्मशानभूमीत जाणाऱ्या या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांंपासून सुरू असली तरी मनपा व या प्रभागाच्या नगरसेवकाच्या दुर्लक्षामुळे ती प्रलंबित आहे.
सिव्हील लाईन प्रभागातील कंवरराम चौक ते डॉ. आंबेडकर कॉलेजपर्यंतच्या रस्त्याने सर्वाधिक वाहतूक असतांनाही पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामत: रस्त्यावर सर्वत्र चिखल असल्याने दुचाकी स्वार व पायी जाणारे चिखलात फसून पडत आहेत. शहरातील श्रीमंत वर्ग रामनगर ते दाताळा प्रभागात वास्तव्याला असतांना सुध्दा सर्वात खराब रस्ते याच प्रभागात आहेत. साईमंदिर ते जनता कॉलेज या मार्गावर चिखलाचे साम्राज्य आहे. बाजार वॉर्ड, शहरातील मुख्य गोल बाजार, घुटकाळा प्रभागातून सिस्टर कॉलनीकडे जाणारा रस्ता ठिकठिकाणी फुटलेला, तर विठ्ठल मंदिर प्रभागातही मुख्य मार्गाची अवस्था वाईट आहे. सरदार पटेल महाविद्यालयाकडे जाणारा मार्ग, तसेच गंजवॉर्ड भाजी बाजाराच्या रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे.
आझाद बगीच्यालगत सिटी हायस्कुल ते नोकिया शो रूम या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याची अवस्था न भूतो न भविष्य इतकी वाईट झाली आहे. गणेशोत्सवात याच रस्त्यावर गणेशमूर्तीची दुकाने थाटली जातात. आता तोच रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवल्याने पावसाचे पाणी व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अंचलेश्वर प्रभाग, महाकाली मंदिर, इंदिरा नगर, रैयतवारी कॉलरी, भिवापूर या प्रभागातही अशीत स्थिती आहे. तुकूम व शास्त्रीनगर प्रभागात कधी काळी अतिशय चांगले रस्ते होते. परंतु, आज तेथे रस्ते नव्हे, तर खड्डेच बघायला मिळतात. डॉ. आंबेडकर चौक ते बिनबा गेट, श्री टॉकीज चौकात चिखलाच्या साम्राज्याने कळस गाठला आहे. बसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्थानक व तिकडे आरटीओ ऑफीस, आयकर भवन, एलआयसी ऑफीसकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
सध्या पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट व जटपरुा गेट ते गांधी चौक व गिरनार चौक ते अंचलेश्वर गेट या दोन रस्त्यांची अवस्था थोडी बरी आहे. त्याला कारण म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण केले. अन्यथा, या रस्त्यांची अवस्थाही अतिशय वाईट होती. हे मुख्य मार्ग सोडले तर शहरात अंतर्गत रस्त्यांनी चालणे कठीण झाले आहे. मनपाच्या कंत्राटदारांनी अतिशय निकृष्ट कामे केल्याने शहराची वाईट अवस्था झाल्याची ओरड आता सर्वसामान्यही करीत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांसारखेच अंतर्गत रस्ते हवे असतील तर तेही बांधकाम विभागाकडून करून घ्यावे, अशी मागणी आता समोर आली आहे. मात्र, याला मनपात सक्रीय कॉंग्रेसच्याच एका गटाचा तीव्र विरोध आहे. हा विरोध असला तरी स्थानिक नेत्यांनी शहरातील लोकांच्या भल्यासाठी व अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

Story img Loader