तीन जिवलग मित्रांची गोष्ट सांगणारे अनेक चित्रपट मराठी-हिंदीत येऊन गेले आहेत. तीन मित्रांच्या गोष्टीमध्ये आणखी एक त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असलेला नवीन मित्र त्यांना येऊन मिळतो आणि चार मित्र एका सिनेमा बनविण्याच्या उद्देशाने वाटचाल करतात. एड्सविषयक अतिशय विनोदी ढंगाने जनजागृती करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न ‘पोपट’ या चित्रपटाद्वारे यशस्वी झाला आहे. परंतु एड्सविषयक जनजागृती आजच्या काळात चित्रपटाद्वारे करणे हे किती सयुक्तिक ठरते, हा प्रश्न पडतो. चार प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलावंतांचा अभिनय हेच या चित्रपटाचे सामथ्र्य ठरले आहे.
कोल्हापूरजवळच्या कुळपे नामक गावात राहणारे रघुनाथ हिवाळे, बाळ्या चिंचुके आणि मुकुंद बोराटे हे तीन जिवलग मित्र. शिक्षणाची आवड असलेला मुकुंदा ऊर्फ मुक्या अनेकदा नापास होतोय, बाळ्या लोकांना थापा मारून टोप्या घालणारा आहे आणि रघुनाथ ऊर्फ रघ्याला सिनेमात हीरो बनायचेय. तिघांनाही मोठ्ठे व्हायचेय, पण कसे व्हायचे, काय करायचे, तो मार्ग ते चाचपडताहेत. गावात एड्स जनजागृती करणारी मोहीम सरपंच आणतात. त्यामध्ये निरोधाचे वाटप घरोघर जाऊन करण्याचे काम या तिघांना मिळते. एड्स म्हणजे काय, निरोध कसा वापरतात, या सगळ्याची माहिती या तिघांना नाही, त्यामुळे ते गावकऱ्यांना निरोध वाटप करायला जातात तेव्हा त्यांना अपमानास्पद अनुभव येतो.
सिनेमात एक्स्ट्राची कामे करणाऱ्या रघूला बाळ्या आणि मुक्याच्या गोंधळामुळे सिनेमातून काढून टाकले जाते. त्यामुळे नाराज झालेला रघ्या आपल्या दोन्ही मित्रांना बोल लावतो. निराश झालेल्या रघूला आपण सिनेमा काढू या असे बाळ्या सांगतो. पण कॅमेरा कुठून आणायचा, असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा त्यांना शेजारच्या गावातील जनार्दनभाऊंची आठवण होते. जनार्दनला समजावून सिनेमा काढण्याचे ठरवितात आणि मग गोष्ट कुठची घ्यायची त्याचा विचार करतात. दरम्यान गावात एड्स जनजागृतीसाठी सादर होणारे पथनाटय़ पाहिल्यानंतर त्याच विषयावर सिनेमा काढायचे ते ठरवतात. मग अनेक गमती-जमती, सर्वाचेच अज्ञान आणि त्यातून घडणाऱ्या गमती-जमती हा सिनेमाचा विषय आहे.
लेखक-दिग्दर्शकाने हा सिनेमा आजच्या काळातील दाखविला आहे; परंतु एड्सविषयक जनजागृतीचा काळ, निरोधविषयक माहिती मिळविण्याचा काळ दहा-पंधरा वर्षांपूर्वीच उलटून गेला आहे. आज आपल्या समाजामध्ये याबाबत भरपूर माहिती, जनजागृती झाली आहे. त्यामुळे आजच्या काळात सिनेमाद्वारे जनजागृती करण्याची गरज उरलेली आहे असे वाटत नाही. परंतु सिनेमाचा संपूर्ण भर प्रमुख व्यक्तिरेखांच्या याविषयीच्या अनभिज्ञतेमुळे निर्माण झालेल्या गमती-जमतीवर आहे.
विनोदाच्या ढंगाने जनजागृती करण्यात चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे. २००० सालापूर्वी हा चित्रपट आला असता तर त्याची समर्पकता वाढली असती हे मात्र खरे.
अमेय वाघने साकारलेला रघुनाथ, केतन पवारचा मुकुंदा, सिद्धार्थ मेननने रंगविलेला बाळ्या आणि अतुल कुलकर्णीनी साकारलेला जनार्दन या सर्वाच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि नेहा शितोळे, अनिता दाते, मेघा घाडगे या अभिनेत्रींनी त्यांना दिलेली उत्कृष्ट साथ यामुळे चित्रपट करमणूक करण्यात मात्र यशस्वी ठरतो. रंगभूमीवरील तीन दमदार कलावंत या चित्रपटाद्वारे मराठी प्रेक्षकांसमोर आले आहेत. अतुल कुलकर्णी यांनी अभिनय येत नसल्याचा केलेला अभिनय झकास जमला आहे.
पोपट
निर्माता- दिग्दर्शक – सतीश राजवाडे
पटकथा-संवाद – चिन्मय केळकर
छायालेखन – भास्कर सामला
संगीत – अविनाश-विश्वजीत
कलावंत – अतुल कुलकर्णी, अमेय वाघ, केतन पवार, सिद्धार्थ मेनन, मेघा घाडगे, नेहा शितोळे, अनिता दाते व अन्य.