राज्यातील इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा व मुस्लिम समाजास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात येईल, असे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी घनसावंगी येथे सांगितले. मराठवाडय़ातील पहिल्या अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजेश टोपे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान उपस्थित होत्या.
पाटील म्हणाले, की नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक मुस्लिम समाजास आरक्षण देण्याचाही शासनाचा मानस आहे. हे आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल. मुस्लिम समाजासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्याचप्रमाणे देशात महाराष्ट्राने पहिल्यांदा अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले असून, त्यासाठी अर्थसंकल्पात ४०० ते ५०० कोटी रुपयांपर्यंत तरतूद केली आहे. राज्यमंत्री फौजिया खान त्याचप्रमाणे पालकमंत्री राजेश टोपे यांची भाषणे या वेळी झाली. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांची उपस्थिती या वेळी होती. या वसतिगृहात ३३ खोल्या असून, प्रत्येक खोलीमध्ये तीन मुलींच्या राहण्याची व्यवस्था आहे. वसतिगृहात संगणक कक्ष व अभ्यासिकेची सुविधा आहे.

Story img Loader