मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूर सर्किट बेंचबाबत ३१ जानेवारीपर्यंत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध वकील धर्यशील पाटील यांनी व्यक्त केला. कराड वकील संघटनेच्या आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. सातारा वकील संघटनेचे अध्यक्ष अशोकराव जाधव, कराड वकील संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड सयाजीराव पाटील, उपाध्यक्ष शशिकांत मोहिते, डी. एम. जगताप, संभाजीराव मोहिते यांच्यासह सभासद वकील बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अॅड. डी. व्ही. पाटील म्हणाले, की सहा जिल्ह्यांतील वकील संघटनांनी २९ ऑगस्टपासून न्यायालयीन कामकाजात असहकार नोंदविला होता. वकिलांच्या या आत्मक्लेश आंदोलनाचे पडसाद सहा जिल्ह्यांसह राज्यभर उमटले. तब्बल ५५ दिवस वकिलांनी काम बंद करून एकजुटीचे दर्शन घडविले. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांना पत्र पाठवून सर्किट बेंचसाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते. वकील संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कृती समितीच्या सदस्यांना आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दोन वेळा निमंत्रित केले होते.
मुख्य न्यायमूर्तीच्या आवाहनानंतर व ३१ जानेवारीपर्यंत कोल्हापूर सर्किट बेंचबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, या शब्दावर वकील संघटनांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे काही वकिलांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतु ३१ जानेवारीपर्यंत मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा सकारात्मक निर्णय घेतील अशी मानसिकता वकीलवर्गासह सहा जिल्ह्यांतील पक्षकारांमध्ये निर्माण झाली आहे. मुख्य न्यायमूर्तीच्या आवाहनाचा आदर राखत कृती समितीने कामबंद आंदोलन मागे घेतले असून, सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले आहे. लवकरच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कोल्हापूर येथील सर्किट बेंचच्या जागेची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. कोल्हापूर हे सर्किट बेंचसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व निकषांना पात्र ठरत असल्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत सर्किट बेंचचा निर्णय होईल असा विश्वास अॅड. पाटील यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक कराड वकील संघटनेचे सचिव अॅड. हरिशचंद्र काळे यांनी केले.