महापालिका पूर्व प्रभाग सभापतिपदी भाजपचे कुणाल वाघ, पंचवटी प्रभाग सभापतिपदी भाजपच्या शालिनी पवार तर नाशिक पश्चिम प्रभागाच्या सभापतिपदी मनसेच्या सुनीता मोटकरी हे विजयी झाले. पूर्व प्रभागात अखेरच्या क्षणी शिवसेनेने भाजपच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप व काँग्रेसच्या उमेदवारास समान मते मिळाली. मग, चिठ्ठी पद्धतीने झालेल्या निवडीत भाजपची लॉटरी लागली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना महापालिकेचे प्रभाग समिती सभापतिपद ताब्यात घेण्याकरिता सारेच पक्ष धडपड करत होते. सहा प्रभागांपैकी तीन प्रभागांच्या सभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. त्यात सत्ताधारी मनसे-भाजपचा वरचष्मा राहिल्याचे पाहावयास मिळाले.
या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष इच्छुक असल्याने आणि शिवसेनेच्या भूमिकेवर काही ठिकाणी बरेच अवलंबून असल्याने त्याकडे सर्वाचे लक्ष होते. लोकसभा निवडणुकीमुळे वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित येण्याची शक्यता नव्हती आणि घडलेही तसेच. पूर्व विभागात भाजपचे प्रा. कुणाल वाघ आणि काँग्रेस आघाडीच्या समीना मेमन यांच्यात लढत झाली. महत्त्वपूर्ण ठरणारे शिवसेनेचे एक मत भाजपच्या पारडय़ात पडल्याने या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी चिठ्ठी पद्धतीचा अवलंब केला. त्यात प्रा. वाघ हे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.
पंचवटी प्रभाग सभापतिपदासाठी भाजपच्या शालिनी पवार यांची अविरोध निवड झाली. या प्रभागात सत्ताधारी मनसे व भाजपचे बहुमत होते. त्यामुळे ही निवडणूक अविरोध पार पडली. नाशिक पश्चिम प्रभागात सत्ताधारी आघाडीचे बहुमत आहे. यामुळे ही निवडणूक अविरोध पार पाडली. या प्रभागाच्या सभापतिपदी मनसेच्या सुनीता मोटकरी यांची निवड झाली. शनिवारी उर्वरित नाशिकरोड, सातपूर आणि सिडको प्रभाग सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे.