भारतीय जनता पक्ष शहराध्यक्ष निवडही पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष निवडीप्रमाणेच एकमताअभावी रखडली आहे. पक्षश्रेष्ठींही यात लक्ष देत नसल्याने इच्छुकांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे.
शहराध्यक्ष पद निवडणुकीचे निरीक्षक माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी २० मार्चचा मुहूर्त जाहीर केला होता. तो आता उलटून गेला. नव्याने कोणती तारीख जाहीर झालेली नाही. ढाकणे यांना यासंबधी विचारले असता त्यांनी १० एप्रिलपर्यंत ही निवड होईल असे सांगितले. तत्पुर्वी नगरमध्ये येऊन प्रभाग समित्यांच्या आढावा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महापालिकेची निवडणूक पुढे लगेचच डिसेंबरमध्ये असल्याने या पदासाठी इच्छुकांची संख्या एकदम वाढली आहे. खासदार गांधी गट व त्याविरोधात माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, प्रताप ढाकणे यांचा गट असे २ गट आहेतच, पण आता विद्यमान शहराध्यक्ष मिलिंद गंधे हेही गट म्हणून पुढे येत आहे. आपल्या सगळ्या कार्यकारिणीलाच त्यांनी गट म्हणून सक्रिय केले आहे.
खासदार गांधी गटाकडून माजी शहराध्यक्ष सुनिल रामदासी, सध्याचे शहर सरचिटणीस अनिल गट्टाणी हे दावेदार आहेत. त्यांच्यात एकमत नाही. गंधे यांना मुदतवाढ हवी आहे. ती मिळाली नाही तरी गांधी गटाकडे पद जायला नको यासाठी त्यांनी सध्याचे सरचिटणीस जगन्नाथ निंबाळकर, तसेच स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांचीही नावे पुढे आणली आहेत. याशिवाय आणखी काही नवेजुने पदाधिकारी या पदासाठी इच्छुक आहेत.
शहरात एकूण ६५ प्रभाग आहेत. या प्रत्येक प्रभागात पक्षाची समिती असणे आवश्यक आहे. या समित्यांच्या अध्यक्षांकडून शहराध्यक्षपदाचे नाव निश्चित केले जाणे पक्षाच्या घटनेनुसार अपेक्षित आहे. त्यामुळे मध्यंतरी काही इच्छुकांकडून समित्यांमध्ये आपले वर्चस्व राहील या पद्धतीने बैठका वगैरे घेण्यात आल्या. मात्र अन्य इच्छुकांच्या विरोधामुळे निरिक्षक ढाकणे यांना ती पद्धत रद्द करून समित्यांच्या स्थापनेसाठी नियुक्त निरीक्षकांवर पुन्हा निरिक्षक नियुक्त करावे लागले.
निम्यापेक्षा जास्त प्रभागांमध्ये समित्या स्थापन झाल्या तरीही निवड प्रक्रिया सुरू करता येते. त्याप्रमाणे शहरात साधारण ३५ समित्या स्थापन झाल्या आहे. मात्र निवडणूक व्हायला नको, एकच नाव हवे, त्यावर एकमत व्हायला हवे असे बरेच अलिखित नियमही पक्षात आहेत. या नियमांप्रमाणे एकमत होत नसल्यानेच निवड सतत लांबणीवर टाकली जात असल्याचे समजते.