अठरा वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणातून निवृत्त झालेले विदर्भाचे सांस्कृतिक नेते माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे साईबाबा मंदिरासमोरील घर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार पालकमंत्री संजय देवतळे यांनी प्रचार कार्यालय येथेच थाटले असून आजवर गांधी चौकात दिसणारी काँग्रेस कार्यकर्त्यांची वर्दळ व गर्दी आता साईबाबा प्रभागात बघायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रितसर प्रचाराला सुरुवात झाली असून संजय देवतळे यांचे चंद्रपूर शहरातील प्रमुख प्रचार कार्यालय शांताराम पोटदुखे यांचे निवासस्थान आहे. १९८० पासून सलग चार निवडणुका जिंकल्यानंतर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार हंसराज अहीर यांनी पोटदुखे यांचा तब्बल ९६ हजार १३१ मतांनी पराभव केला. या पराभवानंतर शांताराम पोटदुखे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. यानंतर त्यांनी स्वत:ला शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात गुंतवूण घेतले. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत पोटदुखे व वामनराव गड्डमवार यांच्या पुढाकारानेच माजी खासदार नरेश पुगलिया यांना बऱ्याच वर्षांनंतर लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्या निवडणुकीत पुगलिया विक्रमी दीड लाख मतांनी विजयी झाले होते. तेव्हापासून तर आजपर्यंत या जिल्हय़ात काँग्रेसच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र गांधी चौकातील पुगलिया यांचे निवासस्थान होते. मात्र सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आशीर्वादाने पालकमंत्री संजय देवतळे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि तेथूनच गांधी चौकातून काँग्रेसची सर्व सूत्रे पोटदुखे यांच्या निवासस्थानी गेली. पोटदुखे राजकारणातून निवृत्त झाले असले तरी विदर्भाचे सांस्कृतिक नेते म्हणून आजही त्यांचा साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात दबदबा आहे. शैक्षणिक, साहित्य संमेलन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून पोटदुखे सक्रिय आहेत. मात्र आता १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.
देवतळे यांचे प्रचार कार्यालयाचे मुख्य केंद्र त्यांचे घर झाल्यापासून रोज सकाळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे काम ते करीत आहेत. काँग्रेसच्या सर्व जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना गोळा करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. दुपारी पुन्हा कार्यकर्त्यांशी संपर्क साधायचा. रात्री उशिरापर्यंत आता पोटदुखे कार्यकर्त्यांच्या गोतावळय़ात दिसतात. देवतळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या दिवशी सुध्दा पोटदुखे प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. सेवादल भवनात झालेल्या सभेत मार्गदर्शन करताना पोटदुखे यांनी काँग्रेसच्या सर्व गटांना एकत्र येण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर देवतळे यांच्या नामांकन दाखल केल्याच्या रॅलीचे वृत्त स्थानिक वर्तमान पत्रांच्या कार्यालयात पोटदुखे यांच्या मेलव्दारे आले होते. इतकी त्यांची सक्रियता आहे.
देवतळे कुणबी समाजाचे तर पोटदुखे तेली समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. तेली समाजाच्या बळावर पोटदुखे यांनी सलग चार निवडणुका जिंकल्या. आता याच समाजाला राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी स्वत: गणपतराव अमृतकर, महापौर संगीता अमृतकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कॉंग्रेसचा प्रचार करण्याची विनंती केली. यासोबतच माजी आमदार अॅड. एकनाथ साळवे, प्रभाकर मामुलकर, शफीक अहमद, देवराव दुधलकर, विनायक बांगडे, तसेच जुन्या काळातील कॉंग्रेसनिष्ठ परिवारांशी संपर्क साधून देवतळे यांच्यासाठी काम करण्याची विनंती करताना दिसत आहे.
देवतळे यांच्या प्रचाराची सूत्रे स्वत:कडे घेतल्याने महायुतीचे उमेदवार अहीर यांच्याशी संपर्कात असलेले परंतु पोटदुखे यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले असंख्य प्रतिष्ठितांनी आता तटस्थ राहणेच पसंत केले आहे. पोटदुखे यांच्या बंगल्यात पहाटेपासून तर मध्यरात्री उशिरापर्यंत पुन्हा एकदा वर्दळ बघायला मिळत आहे. जवळपास १८ वर्षांनंतर पोटदुखे यांचे हे निवासस्थान जिल्हय़ाच्या राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र बनले आहे. याच घरातून प्रचारासाठी प्रत्येक गावोगावी गाडय़ा, प्रचार साहित्य, निधी वाटपाचे काम अतिशय जोमाने सुरू आहे. लोकसभा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून देवतळे यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे आहे, असे ते प्रत्येकाला सांगताना दिसतात. या वयातील त्यांचा उत्साह बघून काँग्रेसशी निष्ठावंत असलेले सर्व कार्यकर्ते सुध्दा कामाला लागल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा