मुंबईचे खड्डे हा सर्वाच्याच संतापाचा विषय आहे. पण रविवारी याच खड्डय़ांमुळे दोन चोर तावडीत सापडले. या घटनेमुळे ‘दाग अच्छे हैं’च्या धर्तीवर ‘खड्डे अच्छे हैं’ असा नवा वाक्प्रचार रुजायला हरकत नाही. पप्पू विश्वकर्मा (२३) हा कांदिवली येथे राहणारा तरुण रविवारी रात्री आपल्या घरी जात होता. रात्री साडेदहा वाजता चारकोप येथील सरकारी उद्योग वसाहतीसमोरील रस्त्यावर त्याच्यासमोर एक इनोव्हा गाडी येऊन थांबली. गाडीतून उतरलेल्या चौघांनी विश्वकर्माला चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्याकडील ऐवज लुटायला सुरवात केली. त्यांनी विश्वकर्माकडील दहा हजार रुपयांची रोख रक्कम आणि मोबाइल फोन काढून घेतला. त्यानंतर लगेच गाडीत बसून त्यांनी धूम ठोकली. पण रस्त्यावरील खड्डय़ांमुळे त्यापैकी दोघांना गाडीत बसता आले नाही.
दरम्यान, विश्वकर्माने ‘चोर चोर’ असे ओरडून मदतीसाठी धावा केला. ते पाहून जवळपासचे लोक धावून आले. त्यावेळी गाडीत बसलेल्या आरोपींनी खड्डय़ामुळे गाडीत चढू न शकलेल्या आपल्या दोन साथीदारांना तेथेच टाकून पळ काढला. जमावाने रेहमान शेख (१९) आणि मोफिक शेख (२०) या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ‘खड्डे अच्छे हैं’ असे आता पप्पूला वाटत असावे!