अतिशय निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे दुचाकी घसरून मणक्याला गंभीर दुखापत झालेल्या अंबरनाथ येथील अ‍ॅड. मीना राव यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनास जबाबदार धरले असून थेट उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या अपघातामुळे अ‍ॅड. मीना राव काही महिने अंथरुणास खिळून होत्या. त्यामुळे त्यांच्या वतीने त्यांची बहीण सुमती राव यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत या प्रकरणात दोषी आढळणारे पालिका अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींविरुद्ध गुन्हा दाखल करून खटला भरावा, अशी मागणी केली होती. न्यायालयाने या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्त, तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अंबरनाथमधील रस्त्यांच्या दुर्देशेची चौकशी करण्याचे निर्देश २४ ऑक्टोबर रोजी दिले आहेत.
४ ऑगस्ट रोजी अंबरनाथ शहरातील वडवली विभागातील आपल्या घरी दुचाकीवरून परतत असताना रस्त्यातील खड्डय़ांमुळे अ‍ॅड. मीना राव यांचा अपघात झाला. अचानक समोर आलेल्या भल्या मोठय़ा खड्डय़ात गाडी आदळल्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाले होते. २१ ऑगस्टच्या ‘वृत्तान्त’मध्ये याविषयीचे ‘करिअरही खड्डय़ात’ हे सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते.
एकीकडे न्यायालयात कायदेशीर मार्गाने न्याय मागत असतानाच अ‍ॅड. मीना राव आणि त्यांचे पती सौरभ अळतेकर माहितीच्या अधिकाराचा वापर करून शहरातील रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रस्ताव, अहवाल, खर्च, कामाच्या दर्जाचे परीक्षण आदींची कागदपत्रे मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मात्र प्रशासनाकडून टाळाटाळ अथवा अर्धवट माहिती दिली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांची माहिती देण्यास कुणी टाळाटाळ करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.