कळंबोली येथील लोखंड, पोलाद बाजाराच्या अंतर्गत रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनापर्यंत व्यापारी व वाहतूकदारांनी मांडूनही सुटू शकला नाही. येथील रस्त्यांमधील दोन फुटांच्या खड्डय़ांमुळे रस्त्याला पासवाळ्यात तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीमुळे येथील वाहतूकदार, व्यापारी त्रस्त झाले आहेत.
लोखंड पोलाद बाजारात १९६० गाळे आहेत. सुरुवातीला हे गाळे पोलाद, लोखंडाचा व्यवसाय करण्यासाठी वितरित करण्यात आले. मात्र कालांतराने हे गाळे वाहतूकदार, गोदाम मालकांनी आणि गॅरेज व्यवसायिकांनी विकत घेतले. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक सातत्याने होत राहिली. लोखंड पोलाद बाजार समितीने येथील गाळेधारकांकडून सेवाकर जमा केला. मात्र येथील पायाभूत सेवा पुरविण्याचा नावाने येथे कायमस्वरूपी ठणठणाट राहिला. व्यापाऱ्यांनी या समस्येतून सुटका होण्यासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. अजित पवारांनी सिडको प्रशासनाला फैलावर घेऊन येथील रिंगरूट मार्गाचे काँक्रिटीकरण करून घेतले. मात्र बाजारातील अंतर्गत मार्गातील खड्डे वर्षांनुवर्षे न बुजविल्याने पावसाळ्यात येथील खडय़ात पाणी साचल्याने तळी निर्माण झाल्याचा भास होत आहे. येथील काही खड्डे दोन फूट खोल असल्याने हा रस्ता जणू वाहनांचे चाक गिंळकृत करीत असल्याचा भास या खड्डय़ात अडकलेल्या वाहनाच्या चालकाला होते. यामुळे या रस्त्यावरून अनेकदा प्रवास करणे वाहचालक टाळतात. येथील गाळ्यांमधील कधी आग लागण्याची दुर्घटना घडल्यास येथील खड्डय़ांमुळे अग्निशमन दलाच्या बंबालादेखील या ठिकाणी वेळेवर पोहचणे कठीण होते. अशीच परिस्थिती पोलिसांची आहे. पोलीस चौकीसाठी राखीव भूखंड पोलिसांना हस्तांतरित केलेला नाही. एखादी घटना घडल्यास खड्डय़ांमधून पोलीस मार्ग काढेपर्यंत घटनास्थळावरून चोर पळून गेल्याच्या अनेक किस्से येथे घडलेले आहेत. खड्डे आणि पाण्यामुळे येथे चोरटय़ांचे फावले आहे.
सरकार दरबारी खड्डय़ांपासून सुटका होण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतरही व्यापारी व वाहतूकदारांना यश न मिळाल्याने तळोजा-कळंबोली वाहतूकदार संघटनेच्या अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी गणेशोत्सवाचा विर्सजन सोहळा याच खड्डय़ांमधील तळ्यांमध्ये करण्याची अनुमती पोलीस उपायुक्तांकडे गेल्या वर्षी मागितली होती. तरीही बाजार समितीला अद्याप जाग येत नाही. समितीकडे फंड नसल्याचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनीच वर्गणी काढून खड्डे बुजविण्याची शक्कल बाजार समितीने लढवली आहे. परंतु हीच समिती बाजारात येणाऱ्या वाहनांकडून टोलवसुलीच्या माध्यमातून सुमारे ५ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावण्याचा अधिकार सोडायला तयार नाही. याबाबत बाजार समितीचे अध्यक्ष गुलाबराव जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

Story img Loader