खारघर वसाहतीमधील सेक्टर ११ ते १२ येथील मार्गाना अतिक्रमनाचा घट्ट विळखा बसला असून येथील रस्त्यांना खडय़ांचे ग्रहण लागले आहे. बँक ऑफ इंडिया ते शंकर मंदिरापर्यंतचा मार्गावरील अतिक्रमणामुळे येथून चालणाऱ्यांना रहिवाशांना कसरत करून घर गाठावे लागते.
नियोजित शहर असलेल्या खारघरला फेरीवाल्यांचे अतिक्रमण ही मुख्य समस्या भेडसावते. काही व्यापाऱ्यांनी फुटपाथवर आणि फेरीवाल्यांनी रस्त्यांलगत अतिक्रमण केल्याने फुटपाथ मोकळा श्वास कधी घेईल, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. खारघर वसाहतीमध्ये सर्वात अगोदर बँक ऑफ इंडिया, केंद्रीय विहार ते शंकर मंदिराशेजारील लोकवस्ती, गोखले विद्यालयाशेजारील वसाहत वसली. मात्र सुरुवात ज्या रहिवाशांपासून झाली त्याच रहिवाशांच्या माथी समस्यांचे ग्रहण बारमाही लागलेले आहे. याच परिसरात मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. बांधकामांमुळे रस्त्याचा मध्यभाग व्यापला आहे. रस्त्याच्याकडे लगत चालणाऱ्या प्रवाशांना फुटपाथवरून चालण्याची सोय येथे नाही. येथील फुटपाथवर व्यापाऱ्यांचा ताबा आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांचे मनमानी धंदे उभे आहेत. सामान्यांना हक्काची वाट नसल्याने ते रस्त्यामधून चालतात. मात्र तेथेही रस्त्यातील खड्डे आहेत. खडय़ांमधून चालणाऱ्या वाहनांमुळे येथील सामान्य रहिवाशी त्रासले आहेत. यापूर्वी खारघरमधील फेरीवाले आणि पोलीस यांचे हितसंबंध याअगोदर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केले आहे. यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. काही काळानंतर हे चक्र तेरी भी चूप मेरी भी चूप अशा पद्धतीने पुन्हा सुरू झाल्याचे समजते. सिडकोची धाड फेरीवाल्यांवर कधी आहे याची माहिती मिळण्यासाठी आणि मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे रस्त्यामधील अडथळा केल्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई टाळण्यासाठी हे हितसंबंध फेरीवाल्यांनी जपले आहेत. तरीही येथील नागरिक सिडकोने हा अतिक्रमनाचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा बाळगली आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी वसाहतीमध्ये सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पाहणी दौरा केला होता. १५ ऑगस्टपूर्वी हे खड्डे बुजविण्यात येईल, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमोर दिले होते. खारघरवासीय िहदुरावांच्या त्या आश्वासनपूर्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
खारघरला अतिक्रमण, खड्डय़ांचे ग्रहण
खारघर वसाहतीमधील सेक्टर ११ ते १२ येथील मार्गाना अतिक्रमनाचा घट्ट विळखा बसला असून येथील रस्त्यांना खडय़ांचे ग्रहण लागले आहे.
First published on: 22-08-2014 at 06:55 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes problem in kharghar