आर्थिक गाडा सुरळीत करण्यासाठी वेळोवेळी पालिकेकडे मदत मागणाऱ्या बेस्टने वीज बिलाचे विलंब शुल्क न भरल्याने आठ पालिका शाळांमधील वीज खंडित केली. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला असून रात्रशाळेतील विद्यार्थ्यांनी तर मेणबत्तीच्या प्रकाशात शैक्षणिक वर्ष सुरू केले.
राज्य सरकारी व खासगी संस्थांकडे असलेली लाखो रुपयांची थकबाकी वसूल करता येत नसलेल्या बेस्टने आपल्याच पालक संस्थेच्या शाळांवर केवळ विलंब शुल्क न भरल्याने कारवाई केली. एल्फिन्स्टन रोड, आदर्शनगर, ग्लोबमिल पॅसेज, वरळी नाका, वरळी सी फेस, प्रभादेवी, जी. के. मार्ग आणि गोखले रोड येथील पालिका शाळांचे ३३ लाख रुपयांचे वीज बिल शिल्लक होते. पालिकेने हे वीज बिल भरले. मात्र थकीत बिलाचे विलंब शुल्क न भरल्याने बेस्टने पंधरा दिवसांपूर्वी या आठही शाळांचा वीजपुरवठा खंडित केला. अर्थसंकल्प प्राप्त होताच थकबाकी ३० जूनपूर्वी भरली जाईल. मात्र तोपर्यंत शाळा सुरू होत असल्याने स्वच्छता व पाण्याचे नियोजन करण्यासाठी वीजपुरवठा सुरू करावा अशी विनंती जी दक्षिण विभागाकडून बेस्टला पाठवण्यात आली. मात्र तरीही वीजपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी अपुरा प्रकाश व उकाडा यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. यातील आगरकर रात्रशाळेचाही वीजपुरवठा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या प्रकाशात पहिला पाठ गिरवावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका रत्ना महाले यांनी हा प्रकार आयुक्तांकडे उघड केला असून पालिका शाळेच्याच विद्यार्थ्यांना अंधारात ठेवणाऱ्या बेस्टबद्दल नापसंती व्यक्त केली आहे.

Story img Loader