अलोट गर्दी, मदान कमी पडल्याने मिळेल तेथे जागा पकडून बसलेले लोक, ‘संडे टू मंडे’च्या गगनभेदी घोषणा, टाळय़ा-शिटय़ांचा निनाद अशा वातावरणात महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील आघाडी सरकारविरुद्ध महाएल्गार पुकारला. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या बीडमध्ये झालेल्या महायुतीच्या या सभेने पूर्वीच्या गर्दीचे विक्रम मोडून टाकताना मुंडेंच्या विजयावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केल्याचा दावा करीत, आता विजयी सभा घेण्याचे नेत्यांनी जाहीर केले. गर्दीकडे बोट दाखवत सर्वच नेत्यांनी पवार-काका पुतण्यांना लक्ष्य करून राजकीय वातावरण पेटवले.
मुंडे यांच्या मतदारसंघातील या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. तीन दिवस तळ ठोकून मुंडेंनी ही सभा यशस्वी करताना यापूर्वीच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढले. सभेला मदान कमी पडले, तसेच सर्व रस्ते लोकांच्या गर्दीने व्यापून गेले होते. मुंडेंच्या नावाने घोषणा, टाळय़ा व शिट्टय़ांच्या प्रतिसादाने नेत्यांमध्येही उत्साह संचारला. प्रत्येक नेत्याने या उत्साहाच्या भरात राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारच्या कारभारावर टिकास्त्र सोडत महायुतीचा एल्गार पुकारला.
शरद पवार यांची नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भेट झाल्याचा उल्लेख करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका खिडकीतून डोळा मारता, तर मग निवडणुकीचे नाटक कशाला करता? दोन्ही दगडांवर पाय ठेवता. त्यांना आणखी पाय असते, तर सर्वच दगडांवर ठेवले असते,’ असा टोला लगावला. भ्रष्ट राष्ट्रवादीला गाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहन त्यांनी केले. खासदार शेट्टी व आठवले यांच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्यांना सत्ता आल्यास तुरुंगात पाठवू, असा इशाराही त्यांनी दिला. मुंडे यांच्यासाठी आता प्रचाराची सभा नाही, तर बीडला विजयी सभाच घेऊ, असेही स्पष्ट केले.
मुंडे यांनी राष्ट्रवादीचे घडय़ाळ आता बंद पडले आहे. त्यांनी चिन्ह बदलून ‘करंगळी’ म्हणजे नसर्गिक विधीची खूण घ्यावी, असा टोला लगावला. अजित पवार यांची सत्तेची मस्ती त्यांना घरी पाठवूनच उतरविणार असल्याचे सांगून आपल्याविरुद्ध राष्ट्रवादीला वर्ष होऊनही उमेदवारच मिळत नाही. मला जिल्हय़ात अडकवून ठेवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पवारांना राजू शेट्टी व महादेव जानकर पश्चिम महाराष्ट्रातूनच बाहेर निघू देणार नाहीत, असेही त्यांनी ठासून सांगितले. मागील वेळेपेक्षा अधिक मताधिक्याने आपला विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आठवले यांनी काव्यात्मक शैलीत आघाडीला चिमटा काढला. तुम्ही मला दिला सत्तेचा वाटा, तर मी बघा काढतो कसा काँग्रेसचा काटा, अशी कोटी करीत मुंडे ३ लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील, असा दावा केला. शेट्टी यांनी महायुतीच्या आसुडाला वादी नसल्याच्या अजित पवार यांच्या वक्तव्यावर ‘आसुडाचा फटका बसल्यासच तुम्हाला वादी कळेल,’ असा टोला लगावून साखरेचे दर पडले म्हणून उसाचे दर पाडण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप पवार यांच्यावर केला. जानकर यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीला अडविणे हेच आपले ध्येय असल्याचे स्पष्ट केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे हे राजकारणातील डॉन आहेत. त्यांना पराभूत करणे शक्य नाही, तर अशक्य असल्याचे पवारांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला दिला. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे यांना डावलून अमराठी अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. आमदार पंकजा पालवे यांनीही जोशपूर्ण भाषण केले. मुंडे यांनी या सभेनिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या निवडणूक प्रचाराची ही सुरुवात ठरली. या सभेने मराठवाडय़ाचे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा