नगर शहरातील काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आमदार, महापौर ही पदे पक्षाकडे आल्यास शहराच्या विकासात सुसुत्रता आणता येईल व विकासाच्या माध्यमातून काँग्रेस शहराचा कायपालट घडवेल, असे अश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल शहरातील तोफखाना भागात बोलताना दिले.
युवक काँग्रेस व नगरसेवक धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने काल दुष्काळानिमित्त पाण्याच्या टाक्यांच्या वितरणाचा कार्यक्रम थोरात यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते ब्रिजलाल सारडा होते. यावेळी रोज रक्त बदलण्याची गरज भासणाऱ्या एका रुग्णाला एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश थोरात यांच्या हस्ते सुपुर्त करण्यात आला. तसेच शिवसेनेच्या विनिता खानविलकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सोलापुरप्रमाणेच विडी कामगारांसाठी नगरमध्ये घरकुल योजना राबवण्याचे तसेच विडीवरील व्हॅट रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करण्याचे अश्वासनही मंत्री थोरात यांनी दिले. यावेळी थोरात यांनी नगरसेवक जाधव यांच्या कार्याचे कौतुक करताना पक्षही त्यांना ताकद देईल, असे सांगितले. श्री. अनंत देसाई, डॉ. अभिजित मोरे, निलिनी गायकवाड आदींची भाषणे झाली. धनंजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. श्री. अभिजित लुणिया यांनी स्वागत केले. सर्वश्री सुवालाल गुंदेचा, श्रीकांत बेडेकर, राजेंद्र नागवडे, संपत म्हस्के, दिप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, सविता मोरे, डि. एम. कांबळे तसेच नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. खलिल सय्यद यांनी आभार मानले.