भारुड वरपांगी विनोदी वटत असले, तरी गंभीर आशय देणारे असल्याने समाजमनाला ते भुरळ पाडते. भारुडात खऱ्या अर्थाने समाजाचे अध:पतन होत असताना त्याला थांबविण्याची भूमिका निभावली, असे मत नगराध्यक्ष व नाटय़ परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी व्यक्त केले. तर बदलत्या काळात भारुडाचे विषय बदलत असले तरी मूळ गाभा कायम ठेवून उत्तम सादरीकरण होऊ शकते, असे चंदाबाई तिवडी म्हणाल्या.
नाटय़ दिग्दर्शक डॉ. वामन केंद्रे यांनी दरवाडी (तालुका केज) येथे सुरू केलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय भारुड महोत्सवात ‘भारुडाचे आशयसूत्र व प्रयोगतत्त्व’ विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन डॉ. क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झाले. राष्ट्रीय भारुडकार निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी, लोककलेचे अभ्यासक साहेबराव खंदारे, पत्रकार जयंत पवार, संयोजक डॉ. वामन व गौरी केंद्रे आदी उपस्थित होते. डॉ. क्षीरसागर म्हणाल्या की, भारुड हे व्यक्तिवाचक, वस्तुवाचक व घटनावाचक साहित्य आहे. त्यातून जीवनव्यवहार समजून घेण्याचा व मनाचा व्यवहार उन्नत करण्याचा प्रयत्न संतांनी केला. वरपांगी भारुड विनोदी वाटत असले तरी त्यात गंभीर आशय असतो. तो समाजमनाला भुरळ घालतो. भारुडाचे सादरीकरण मातीच्या मंचावर केले जाते. कारण थेट मातीशीच नाते असते. भारुडामध्ये गर्भित अर्थ असून त्यात अध्यात्माची कास धरली आहे. ही कला विविध अंगांनी नटली असून यात रंगभूषा, केशभूषा लागत नाही. प्रेक्षक सापेक्ष अभिनय हा मनाचा ठाव घेणारा असतो. लोककलेमध्ये एक वेगळे सामथ्र्य आहे. या कलेला राजाश्रय मिळाला पाहिजे. माणसाला आपलेसे वाटणारे भारुड प्रयोगातून आले पाहिजे. पाऊलखुणा या डांबरी रस्त्यावर उमटत नसून त्या पाऊलवाटावर उमटतात, असे सांगून डॉ. वामन केंद्रे यांनी लोककला जोपासण्यासाठी गावात सुरू केलेला हा महोत्सव या कलेला राजाश्रय मिळवून देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. निरंजन भाकरे यांनी भारुडातून संतांनी मानवाच्या जन्माचे अनेक आदर्श समोर आल्याचे सांगितले. दुसऱ्या सत्रात ‘भारुड- बदलता काळ : दशा आणि दिशा’ या विषयावरही चंदाबाई दिवडी यांनी विषय बदलले तरी मूळ गाभा कायम ठेवून भारुडाचे सादरीकरण उत्तमरीत्या होऊ शकते, हे सादरीकरणातूनच त्यांनी दाखवले. जयंत पवार यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून भारुड सादर केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. 

Story img Loader