पावसाळ्यात अनेकदा विजेचा लपंडाव सुरू असतो. वीज गेल्यानंतर संबंधित यंत्रणेच्या नावाने बोटे मोडली जातात. मात्र, वीज विशेषत: पावसाळ्यात वारंवार का जाते, असा प्रश्न कुणालाच पडत नाही. मोबाईलचे एकदा कनेक्शन घेतले की संबंधित कंपनीला एका ठिकाणी बसून तिची सेवा चालू अथवा बंद करता येते. तीसुद्धा धोक्याशिवाय. वीज यंत्रणेचे तसे नाही. विजेची यंत्रणा अशी यंत्रणा आहे की ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या यंत्रणेत जिवाला धोका असतो. रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात येत असेल तर कोणीतरी अंधारात अथवा पावसाळ्यात स्वत:चा जीव धोक्यात घालून खांबावर चढलेला असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हाच कुठे वीज येते. वीज गेल्यानंतर वीज यंत्रणेवर दोषारोप करण्यापेक्षा त्यांच्यातील गुंतागुंत समजून घेतली पाहिजे, असे मत काही जाणकार वीज तंत्रज्ञांनी व्यक्त केले.
या तंत्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पारंपरिक किंवा अपारंपरिक स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी लाखो मीटर वीज वाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. त्याला ग्रिड म्हणतात. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते.
अनेकदा चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर एखादा जिल्हा किंवा तालुका अंधारात जातो. हा बिघाड गाव किंवा काही भागापुरताच मर्यादित असतो. पावसाळ्यात वादळवारा वा आकाशातील विजांचा कडकडाट सर्वचजण अनुभवतात. तारेच्या जाळ्यातून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज, दोन्हींमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की घरातील वडिलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण उच्चदाबामुळे ही उपकरणे जळण्याची शक्यता असते. दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते. नव्हे तशी सोय ही यंत्रणा वाचविण्यासाठीच केलेली असते. वीज खांबात वीज पुरवठा उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाची चिनीमातीची इन्सुलेटर (चिमणी) खांबावर बसविली जातात. हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीज प्रवाहामुळे गरम होतात. पाण्याचे थेंब पडताच त्याला तडे जातात. त्यामुळे वीज प्रवाह खांबातून जमिनीत उतरतो अन् लागलीच आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित होऊन फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. हा फिडर बंद पडला नाही तर जीवित हानी अथवा वित्तहानी होण्याची शक्यता असते.
वीज पुरवठा अचानक खंडित होतो त्यावेळी वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीज पुरवठा आहे की नाही याची खात्री करीत असतात. वीज पुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. फिडर पुन्हा ट्रीप (बंद) झाला तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित केले जाते. बिघाड शोधणे तेवढे सोपे नसते. ऊन्ह-वारा, पाऊस वा अंधाराची पर्वा न करता शोध घेतला जातो. बंद वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात. कधी हा बिघाड खांबांदरम्यान सापडतो. चूक झाली की जीव जाणार, याची खुणगाठ बांधूनच तंत्रज्ञाला खांबावर चढावे लागते. सर्वतोपरी काळजी घेऊनही प्रत्यक्ष काम करीत असताना तंत्रज्ञाचा जीव जाण्याच्या घटना अधून-मधून घडत असतात.
मानवी संवेदना इतक्या क्षीण झाल्या आहेत की एखाद्याच्या जीवनाचे मोलही आपण ध्यानात घेत नाही. वीज जाते- येते. यादरम्यान काय होते, याचा विचार करू, तेव्हाच हे मोल जाणता येईल, असे यासंदर्भात बोलताना महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा