कळवा, खारेगाव तसेच विटावा परिसरातील काही भागांत विजेची मोठय़ा प्रमाणात चोरी होत असल्याचे महावितरण कंपनीच्या निदर्शनास आले असून अशा वीजचोरांचा शोध घेण्यासाठी महावितरणने विशेष तपासणी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत ज्या रोहित्रावर वीजगळतीचे प्रमाण जास्त आहे आणि वीज देयकापोटी केलेल्या रकमेचा भरणा कमी आहे. अशा रोहित्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या प्रत्येक घरामधील विजेच्या वापरावर चालणाऱ्या वस्तूंची माहिती आणि विजेच्या मीटरमधील रीडिंग, अशी सविस्तर माहिती विशेष पथक घेणार असून त्यामध्ये वीजचोरी होत असल्याचे स्पष्ट होताच संबंधित व्यक्तीविरोधात वीजचोरी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती महावितरणने दिली.
महावितरण कंपनीच्या कळवा उपविभागांतर्गत कळवा, खारेगाव तसेच विटावा आदी परिसर येत असून त्यामध्ये भास्करनगर, आतकोनेश्वरनगर, पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, रेतीबंदर नगर, वाघोबानगर, ईश्वरनगर, शांतीनगर, रेल्वे पटरीचा भाग आदी वस्तींचा समावेश आहे. या वस्तींमधील काही घरांमध्ये अनधिकृतरीत्या अतिरिक्त वीजभार जोडून विजेची चोरी करण्यात येत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. मध्यंतरी, याच परिसरात महावितरणने स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने विशेष मोहीम हाती घेतली होती. त्या मोहिमेत शांतीनगर भागातून १५, रेतीबंदर भागातून ९, अशा एकूण २४ विजेच्या शेगडय़ा जप्त केल्या होत्या. या शेगडय़ा अतिरिक्त वीजभार जोडून वापरण्यात येत असल्याचे लक्षात येताच महावितरणने ही कारवाई केली होती. त्याचबरोबर अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या ३५ लोकांविरोधात वीज कायद्यान्वये कारवाई केली होती. अनधिकृत वीज वापरामुळे अतिरिक्त भार येऊन कळवा, खारेगाव तसेच विटावा परिसरातील लघुदाब वीजवाहिन्या तुटून वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात. तसेच विजेचे अपघातही होतात. याच पाश्र्वभूमीवर महावितरणने वीजचोरांच्या शोधाकरिता विशेष मोहीम हाती घेतली असून त्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. चार ते पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हे पथक असणार आहे. कळवा, खारेगाव तसेच विटावा परिसरातील ज्या रोहित्रावर वीजगळतीचे प्रमाण जास्त आहे आणि वीज देयकापोटी केलेल्या रकमेचा भरणा कमी आहे, अशा रोहित्रावरून वीजपुरवठा असलेल्या ग्राहकांच्या वीज संच मांडणीची तपासणी हे पथक करणार आहे. ग्राहकांचा वीज संच आणि वीजमीटर रीडिंग, यामधील नोंदीच्या तफावतीवरून वीज चोरी पकडण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणने दिली.
भारनियमनाची शक्यता..
कळवा, खारेगाव, तसेच विटावा परिसरातील लघुदाब वीजवाहिन्या अनधिकृत वीजवापरामुळे अतिरिक्त भार येऊन तुटतात आणि या भागातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात. तसेच वीज अपघात होण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे या भागातील वीजगळतीचे प्रमाणही वाढू लागले आहे. वीजगळतीचे प्रमाण नियंत्रणात आले नाही तर या भागात भारनियमन लागू होऊ शकते, असे संकेतही महावितरणने दिले आहेत.

Story img Loader