महावितरणचा गलथान कारभार व सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठय़ामुळे त्याचा परिणाम शहराच्या पाणी वितरणावर होऊन शहरात उशिराने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना असून वीज पुरवटय़ात वेळीच सुधारणा न केल्यास महावितरण विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी दिला आहे.
शहराला सध्या १८ ते २० दिवसाआड नळ पाणीपुरवटा होत आहे. उन्हामुळे पाण्याची तीव्र गरज भासत असताना हा पाणी पुरवठा देखील नागरिकांना कमी पडत आहे. त्यातच सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ामुळे पाण्याच्या नित्यक्रमात बदल होऊन पाणी पुरवठाही उशिरा होतो. चार दिवसात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा शहराच्या पाणीपुरवठय़ावर गंभीर परिणाम झाल्याकडे नगराध्यक्ष धात्रक यांनी लक्ष वेधले आहे. सध्या पाणी असूनही ते नागरिकांना महावितरणच्या कारभारामुळे देता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण वाघदर्डी धरणाच्या एक्स्प्रेस फिडरवरील वीज पुरवठा नियमित पाच ते सहा तास बंद असतो. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महावितरणचे पालिकेकडे पथदिव्यांच्या थकबाकीपोटी बरीच रक्कम बाकी होती. पण तो प्रश्नही आता मार्गी लागला आहे. दोन आठवडय़ांपूर्वीच पालिकेने या थकबाकीपोटी ३४ लाख ४० हजार रुपयांची रक्कम भरली. याशिवाय वाघदर्डी धरणाचे वीज देयक पालिका भरत आहे असे असूनही वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. एक्स्प्रेस फिडरवरून शहराच्या पाणीपुरवटा योजनेला वीज पुरवठा केला जातो. हा वीज पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होता कामा नये. कारण त्यामुळे पाणीपुरवठा योजना विस्कळीत होते. तरीदेखील एक्स्प्रेस फिडरवरील वीजपुरवठा पाच ते सहा तास खंडित होत आहे. महावितरणने एक्स्प्रेस फिडरवरून वीज पुरवठा अखंडितपणे करावा. जनतेला वेठीस धरू नये. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगराध्यक्ष धात्रक यांनी दिला आहे.
अलीकडेच कॅम्प विभागात शाकुंतल नगर ते आनंदवाडी यादरम्यानची जलवाहिनी फुटली होती. परिणामी शहराला १८ दिवसानंतर होणारा पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने पाण्याची सर्वाधिक गरज भासत आहे. घरात साठवलेला पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने सार्वजनिक पाणवठय़ाच्या ठिकाणी गर्दी होत आहे. अनेक सेवाभावी कार्यकर्ते, संस्था व राजकीय पक्षांनी पाण्याचे टँकर सुरू केल्याने तुर्तास नागरिकांना दिलासा मिळत असला तरी घरामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी भरण्यासाठी नळाव्दारे पाणी पुरवठय़ाची गरज आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे एक्स्प्रेस फिडरचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठय़ाबाबत नागरिकांची अवस्था आगीतून उठून फोफाटय़ात पडल्यासारखी झाली आहे.
पाण्यापाठोपाठ मनमाडमध्ये विजेचे संकट
महावितरणचा गलथान कारभार व सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठय़ामुळे त्याचा परिणाम शहराच्या पाणी वितरणावर होऊन शहरात उशिराने पाणी पुरवठा होत आहे.
First published on: 27-05-2014 at 07:31 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power supply problem in manmad