लोकांमधून निवडून आलेल्यांना अधिकार पाहिजेत. त्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही, म्हणून कामचुकारांच्या बदल्या करण्याचा विशेष अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतींना दिला आहे. गावात सर्वाधिक सुविधा देणारी यंत्रणा अशी ओळख निर्माण होण्यासाठी ग्रामपंचायतींना सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी येथे सांगितले.
तांबवे (ता. कराड) येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत साकारलेल्या २४  तास शुध्द पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आणि तांबवे गावचे सुपुत्र, उद्योजक अविनाश भोसले यांच्या नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते. आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, शंभूराज देसाई, माजी खासदार श्रीनिवास पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, उपसभापती विठ्ठलराव जाधव, अ‍ॅड. बाळासाहेब शेरेकर, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील, अ‍ॅड. आनंदराव पाटील, निवासराव पाटील, सह्याद्रीचे संचालक पी. डी. पाटील, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच आबासाो पाटील यांची उपस्थिती होती.
पाटील म्हणाले की, गावातील एखादा माणूस उद्योग-व्यवसाय, नोकरीत मोठा झाला की त्यांच्याबद्दल आत्मीयता व्यक्त केली जाते. प्रयत्नांनी मोठेपण सिध्द करता येते हे अविनाश भोसले यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
उंडाळकर म्हणाले की, राज्यात दुष्काळाचे भीषण चित्र असून, पाणी आता पेटले आहे. माण-खटाव तालुक्यात पाण्याच्या एका घागरीसाठी महिला रस्त्यावर उभ्या असतात. महिनाभर अंघोळ मिळत नाही. याउलट नदीकाठची गावे नशीबवान आहेत. भोसले यांनी सार्वजनिक हित आणि लोकाभिमुख काम ओळखून पाणी योजनेसाठी सहकार्य केले. त्यामुळे गावात गुढय़ा उभारून होणारा सत्कार त्यांच्या वाटय़ाला आला.
अविनाश भोसले म्हणाले की, माणसाला शहरात ज्या सोयी मिळतात त्या आपल्या गावात मिळाव्यात या हेतूने मी या योजनेला सहकार्य केले. येत्या वर्षभरात अंतर्गत रस्तेही होतील अशी मी खात्री देतो.  
बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, विक्रमसिंह पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी केले. आभार निवासराव पाटील यांनी मानले.
 

Story img Loader