कोल्हापूर शहरासह जिल्ह्य़ामध्ये शनिवारी धुवाधार पाऊस झाला. संततधार पावसामुळे जिल्ह्य़ातील ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणातील पाणीसाठा ८० टक्क्य़ांहून अधिक झाला आहे. तर जिल्ह्य़ात गेल्या चोवीस तासांत ६० मि.मी.सरासरी पावसाची नोंद झाली.
गेले तीन दिवस पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. शहरासह पश्चिमेकडील भागाला पावसाने झोडपून काढले आहे.
 दिवस-रात्र मध्यम व मोठय़ा स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. सर्व नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी ३१.८ फूट इतकी होती.
जिल्ह्य़ातील धरणांतील पाणीसाठाही झपाटय़ाने वाढू लागला आहे. राधानगरी ८५ टक्के, तुळशी ६७ टक्के, वारणा ८४ टक्के, दुधगंगा ७३ टक्के, कासारी ७५ टक्के, कडवी ८७ टक्के, कुंभी ८५ टक्के, पाचगाव ७५ टक्के, चित्री ५७ टक्के या सर्वच धरणात जलसंचय वाढीस लागला आहे. राधानगरी व वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.     
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ाच्या सर्वच भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १२२ मि.मी.पावसाची नोंद झाली. अन्य तालुक्यातील पर्जन्यमान याप्रमाणे. चंदगड ७८.६६,गडहिंग्लज ४६.८६, भुदरगड ८२.२, राधानगरी ६७.२, शिरोळ १२.३५, हातकणंगले २७.७८, शाहूवाडी ९०.१६, कागल ४५.७, करवीर ४५, आजरा ५६.७५ मि.मी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा