सिनेमागृहातील प्रत्येक खेळामागे द्यावा लागणारा ‘शो’ कर भरण्याबाबतीत शहरातील प्रभात टॉकीज व्यवस्थापनाकडून ठाणे महापालिकेस वर्षांनुवर्षे ठेंगा दाखविण्यात येत होता. अखेर या टॉकीज व्यवस्थापनास नोटीस बजावून त्यांच्याविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळेच वठणीवर आलेल्या टॉकीज व्यवस्थापनाने गुरुवारी महापालिकेला थकीत ‘शो’ करापोटी सुमारे पाच लाख ६० हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. यापूर्वी अशाच प्रकारे ‘शो’ कर चुकविणाऱ्या ठाण्यातील वंदना तसेच प्रताप सिनेमागृहांकडूनही कराची रक्कम वसूल करण्यात आली आहे. या वृत्ताला महापालिकेच्या संबंधित विभागाने दुजोरा दिला आहे.
ठाणे शहरात मल्हार, अशोक, आलिशान, आनंद, वंदना, प्रताप, प्रभात, गणेश, आराधना, अशी सिनेमागृहे असून त्यांपैकी आराधना, प्रताप आणि प्रभात सिनेमागृह बंद पडली आहेत. प्रभात सिनेमागृहाच्या जागेवर गोल्डन डिजिटल मल्टिप्लेक्स सिनेमागृह उभारण्यात आले असून त्या ठिकाणी एकाच स्क्रीनवर चित्रपटांचे खेळही सुरू झाले आहेत. तसेच शहरात सिनेवंडर, सिनेमॅक्स, आयनॉक्स आणि स्टॉर सिनेमा आदी मल्टिप्लेक्समध्ये चार स्क्रीन असून त्या ठिकाणी एका स्क्रीनवर दिवसाला चित्रपटांचे तीन ते चार ‘शो’ दाखविले जातात. सिनेमागृह तसेच मल्टिप्लेक्समध्ये दाखविण्यात येणाऱ्या प्रत्येक खेळामागे व्यवस्थापनाने महापालिकेला ५५ रुपये ‘शो’ कर देण्याची तरतूद आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या करापोटी महापालिकेने वार्षिक सुमारे ३३ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.
मात्र हा कर भरण्यासाठी शहरातील काही सिनेमागृहे व्यवस्थापनाकडून महापालिकेस ठेंगा दाखविण्यात येत होता. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रभात सिनेमागृह व्यवस्थापनाने हा कर भरलाच नव्हता. या संदर्भात, ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने प्रभात सिनेमागृहाला नोटीस बजावली होती. येत्या पाच दिवसांत थकीत कर भरला नाही तर सिनेमागृह सील करण्यात येईल, असे नोटिशीमध्ये म्हटले होते. त्यामुळेच भेदरलेल्या प्रभात सिनेमागृह व्यवस्थापनाने वर्षांनुवर्षे थकविलेल्या ‘शो’ कराचे सुमारे पाच लाख ६० हजार रुपये धनादेशाने महापालिकेस दिले. यापूर्वी महापालिकेने प्रताप सिनेमागृह व्यवस्थापनाकडून सुमारे दहा लाख ३२ हजार रुपये, तर वंदना सिनेमागृह व्यवस्थापनाकडून सहा लाख ४५ हजार रुपये थकीत कर वसूल केला आहे. त्यासाठीही चंद्रहास तावडे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता.
अपेक्षित उत्पन्नाचा आलेख वाढला
२०११-१२ या अर्थिक वर्षांत ‘शो’ करापोटी १२ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. २०१२-१३ या अर्थिक वर्षांत या करापोटी २० लाख रुपयांचे अपेक्षित उत्पन्न होते. मात्र, गतवर्षी दोन सिनेमागृहांकडून थकीत उत्पन्नाची रक्कम वसूल झाल्यामुळे या करामध्ये वाढ झाली. त्यामुळे यंदाच्या २०१३-१४ या अर्थिक वर्षांत या करापोटी ३३ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.
‘शो’कर पूर्वी आणि आता
२००६-०७ मध्ये ‘शो’ कराचा दर १५ रुपये प्रतिखेळामागे होता. २००७-०८ मध्ये या कराच्या रकमेत वाढ करून तो ५० रुपये करण्यात आला. त्यानंतर २०१२ मध्ये या दरात पाच रुपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे आता या कराचा दर ५५ रुपये प्रतिखेळामागे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा