हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या रेल्वेप्रवाशाला ‘ट्रॅक’ कसा बदलतो, हे माहीत असते का? रेल्वे रुळावरून सहसा घसरत नाही, याचे वैज्ञानिक कारण काय? असे अनेक प्रश्न मुलांच्या मनात असतात. उत्तर माहीत नसले, की मुलांवर आपण चिडतो. त्यांना शांत बसवतो. पण विज्ञान सोपे करून सांगण्याची पद्धत आपल्याकडे नाही. ही पद्धत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी श्याम दांडे व अनिल सुरडकर हे दोन कार्यकर्ते ‘लोकविज्ञान’ चळवळ रुजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातूनच क्रिएशन ही संस्था उभारण्यात आली असून, उद्या (शुक्रवारी) मुलांसाठी शहरातील प्रोझोन मॉलमध्ये ‘रेल्वेचे तंत्रज्ञान’ समजावून सांगण्यासाठी वेगळा प्रयोग हाती घेण्यात आला आहे.
मुलांना किती प्रयोग लिहिले असे विचारले, की ती संख्या ७० किंवा ८० असते. पण त्यातील किती प्रयोग केले, हा प्रश्न विचारला की उत्तर येते तीन किंवा चार! वैज्ञानिक मनोधारणा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न होत नाहीत. ही उणीव लक्षात आल्यानंतर श्याम दांडे यांनी काही वैज्ञानिक प्रदर्शने मांडण्याचे ठरवले. मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हची नोकरी करताना मुलांमधील वैज्ञानिक जाणिवा वाढविण्यास त्यांनी विविध प्रयोग केले. ‘युरेका’ नावाने ३० प्रश्नांचा एक संच उन्हाळय़ाच्या सुटीत मुलांना ते द्यायचे. त्याची उत्तरे कोणाकडूनही शोधून आणायला सांगायचे. अशी उत्तरे सोडविणाऱ्या मुलांना बक्षिसेही द्यायचे.
वैज्ञानिक जाणिवा निर्माण करण्यासाठी पुढचा टप्पा म्हणून वेगवेगळे उपक्रम हाती घेण्याचा त्यांचा मनोदय आहे. जानेवारी महिन्यात अपारंपरिक ऊर्जास्रोतावरील प्रदर्शन, बायोगॅसचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. मुलांच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी विज्ञान सोपे करून सांगण्यासाठी ‘क्रिएशन’ ही संस्था स्थापन करण्यात आली असून, त्यात अनिल सुरडकरही त्यांनी साथ देत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा